
तब्बल ५ यांत्रिक झाडूंची केली जाणार खरेदी
मुंबई : मुंबई महापालिकेमार्फत धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्प अंतर्गत वाहतुकीसाठी मार्गिका खुल्या करण्यात आल्यानंतर या मार्गावरील स्वच्छतेसाठी यांत्रिक झाडूचा वापर केला जाणार आहे. या मार्गावर मनुष्यबळाचा वापर करून दैनंदिन सफाई करणे शक्य नसल्याने यांत्रिक झाडून या मार्गाची सफाई राखली जाणार आहे.
शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट) उड्डाणपूल ते वांद्रे - वरळी सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत कोस्टल रोड बांधण्यात येत आहे. या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. दक्षिणवाहिनी बिंदूमाधव ठाकरे चौक, रजनी पटेल चौक (लोटस जंक्शन) आणि अमरसन्स उद्यान ते मरीन ड्राईव्ह ही मार्गिका तसेच, उत्तरवाहिनी मरीन ड्राईव्ह, हाजी अली आणि रजनी पटेल चौक (लोटस जंक्शन) ते वांद्रे वरळी सागरी सेतूपर्यंतची (राजीव गांधी सागरी सेतू) मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे.
दरम्यान, धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) मार्गावर भरघाव वाहने चालवली जात आहे. त्यामुळे या मार्गावर सफाई राखण्याची विनंती कोस्टल रोड प्रकल्पाच्या प्रमुख अभियंत्यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे केले आहे. त्यानुसार, घनकचरा व्यवस्थापन विभागाने या मार्गावर मनुष्यबळाचा वापर करून सफाई करणे शक्य नसल्याने यात्रिक झाडूद्वारे याची मार्गाची सफाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ३ मोठ्या आणि २ छोट्या इलेक्ट्रिक यांत्रिक झाडूचा वापर केला जाणार आहे. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.