Tuesday, April 29, 2025
Homeहार आणि प्रहारअधिवेशनात सैरभैर आणि दिशाहीन झालेले विरोधक...

अधिवेशनात सैरभैर आणि दिशाहीन झालेले विरोधक…

  • नारायण राणे, खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री

आज गुढीपाडवा. ब्रह्मदेवाने आजच्या दिवशी हे विश्व निर्मिले असे मानले जाते. आजचा दिवस हा सर्वात शुभ दिवस म्हणून सर्वत्र आनंद, उत्साहात साजरा होत असतो. त्यानिमित्ताने ‘हार आणि प्रहार’ या सदरातून वाचकांशी हितगुज करण्याचा निर्णय मी घेतला. मध्ये बराच काळ लोटला. मला सारखे वाटत होते आपण ‘हार आणि प्रहार’च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेशी बोलले पाहिजे. त्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेतल्या पाहिजेत.

छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र, एक लोक कल्याणकारी राज्य बनावे, असे सर्वांनाच वाटते. पण आजचा महाराष्ट्र नेमका कुठे आहे?  आर्थिक समृद्धीमध्ये महाराष्ट्र कोठे आहे आणि त्याचबरोबर जागतिक विकासात महाराष्ट्राचे स्थान कोठे आहे हे जाणून घेणे मला महत्त्वाचे वाटते. तत्पूर्वी आजच्या गुढीपाडव्याच्या शुभ दिनाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना पाडव्याच्या शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांना सुख-समाधान आणि सुयश चिंतितो. तसेच आगामी काळ आनंदाचा जावो,  अशाही शुभेच्छा या मंगलदिनी देतो. आपल्या घरी उभारलेली गुढी ही विकास आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. त्यामुळेच गुढीपाडव्याला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे.

महाराष्ट्रात नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या व त्यामध्ये भाजपा, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा तीन मोठ्या पक्षांचे महायुतीचे सरकार सत्तेवर आले. नुकतेच राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले. अधिवेशनातील विरोधकांच्या कामकाजाबद्दल आणि त्यांनी संसदीय व्यवस्थेतील वेगवेगळी आयुधे वापरून, त्याच्या माध्यमातून उपस्थित केलेले विषय मी ऐकले आणि पाहिले. महाराष्ट्राच्या विधानसभेतील एकूण २८८ आमदारांपैकी विरोधी पक्षांचे जेमतेम ५०च्या आत आमदार निवडून आले आहेत. विरोधी पक्षांचे स्वयंघोषित नेत्यांनी अधिवेशनात सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला काय?  महाराष्ट्राची विकासाची दिशा काय असावी याचे कधी मार्गदर्शन केले काय? तर त्याचे उत्तर नाही, हे आहे. विरोधकांनी या अधिवेशनात केवळ सत्तारूढ पक्षांवर तसेच सत्ताधारी नेत्यांवर वैयक्तिक टीका करण्याचे काम केले. मुख्यतः विरोधी पक्षांचे एक नेते ज्यांना उबाठा पक्षाचे नेते म्हणतात. मी त्यांचा उर्मट नेता म्हणूनच उल्लेख करेन. कारण मुळात त्यांच्याकडे कोणतीही भाषाशैली नाही, शब्दसंग्रह नाही, विधिमंडळ कामकाजाचा कसलाही गंध नाही. मला अर्थसंकल्प समजत नाही, असे स्वत:च म्हणतात. कामकाजाचे नियम माहिती नाही, असा माणूस सरकारवर टीका तरी कशी करू शकतो? असा प्रश्न मला पडतो. विरोधी पक्षनेता नेमला नाही म्हणून टीका केली. मुळात या उर्मट नेत्याला महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेता नियुक्त होण्यासाठी किती आमदार लागतात, हे माहिती नाही. काही तरी बोलायचे, आपण अडीच वर्षे या राज्याचे मुख्यमंत्री होतो, याचे साधे भानही राखायचे नाही. ना सभागृहातील कामकाजाची माहिती, ना अर्थसंकल्पाची काही माहिती. शब्दा- शब्दांत खोटारडेपणा दाखवून देणारे त्यांचे ते रटाळ, निरुत्साही, कंटाळवाणे बोलणे होते. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात  विरोधी बाकांवरून एकाही आमदाराचे प्रभावी भाषण मला ऐकण्यास अथवा वाचण्यास  मिळाले नाही. त्यामुळे हे अधिवेशन… माफ करा… माननीय मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय…

विरोधकांच्या सावळ्या गोंधळातच संपून गेले. विकासाचे चांगले प्रस्ताव, शेतकऱ्यांचे प्रश्न, औद्योगिकीकरण तसेच महाराष्ट्रातील बेकारी संपवावी, असे कोणतेही महत्त्वाचे प्रश्न विरोधकांनी लावून धरले नाहीत.

काँग्रेस नेत्यांबद्दल काय बोलावे. यापूर्वी काँग्रेसचे अनेक प्रभावी आणि अभ्यासू नेते तसेच त्यांची अर्थसंकल्पावर गाजलेली भाषणे मी स्वतः ऐकली आहेत व पाहिली आहेत. पण आता मात्र या सावळ्यागोंधळात काँग्रेसचे नेतेही सामील होते. त्यामुळे विरोधकांनी या अधिवेशनात काय कमावले, असे म्हणण्यापेक्षा त्यांनी सर्वच गमावले. असे म्हणण्याची परिस्थिती ओढवली आहे. आता या तिन्ही पक्षांना हे माहिती झाले आहे की, त्यांची संख्या ५०च्या आत आहे. आता सत्ता काही येणार नाही. त्यामुळे त्या नैराश्यात सभागृहाच्या कामकाजात लक्ष लागत नाही. म्हणून मग भाजपाचे नेते मुख्यमंत्री,  दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच भाजपाच्या अन्य मंत्री यांच्यावरील व्यक्तिगत टीकेशिवाय विरोधकांकडे दुसरा कोणताही विषय नाही, असे दिसून आले.

एक विषय मुद्दाम म्हणून सांगेन, विरोधकांची भंबेरी उडाली ती सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन हत्या प्रकरणाच्या विषयात. श्रीयुत उद्धव ठाकरे या प्रकरणात सभागृहात काही बोलत नाहीत. पण सभागृहाच्या बाहेर मात्र बोलतात  आणि सांगतात, दिशा सालियन केस प्रकरणात माझा काडीमात्र संबंध नाही. हे राज्यात मुख्यमंत्री असताना दिशा सालियन आणि सुशांत सिंग प्रकरण घडले आणि हा माणूस सांगतो, मला यात काहीही माहिती नाही! हा याचा किती खोटारडेपणा आहे?  त्यांच्या लाडक्या  चिरंजीवांचे आदित्यचे नाव या प्रकरणात आरोपी म्हणून घेतले जाते आणि हे म्हणतात  यांचा काडीमात्र संबंध नाही!

आज मला आठवतात ते माननीय बाळासाहेब ठाकरे. सच्चाईचे प्रतीक म्हणजे श्री. बाळासाहेब ठाकरे. जे बोलायचे ते खरे, ज्यामुळे लोकांना न्याय मिळेल असे साहेब नेहमी बोलत. आयुष्यात सडेतोड भूमिका व प्रामाणिकपणा याचा साहेबांनी सदैव प्रत्यय आणून दिला. साहेबांनी आयुष्यात जे मिळवले, ते खोटे बोलून, त्यांचे चिरंजीव म्हणवून घेणाऱ्यांनी सर्व गमावले, संपवले आहे. शिवसेना संपवली. माझ्याशी या प्रकरणात दोन वेळा आमदार मिलिंद नार्वेकरच्या फोनवर बोलणे झाले असतानाही हे बेधडकपणे म्हणतात, बोलणे झालेच नाही म्हणून!

एक संजय राऊत नावाचा, बिनबुडाचा, सतत खोटे बोलणारा माणूस यांच्याकडे आहे. खऱ्याचे खोटे करणे आणि खोट्याचे खरे करण्यात तरबेज. ठरावीक पत्रकारांनी याला ऐपत नसताना मोठा केला. तो रोज सकाळी बरळतो. कशामुळे बरळतो, हे जनता जाणते. त्याच्याकडे लक्ष देण्याइतपत त्याला महत्त्व द्यावे, असे मला वाटत नाही.

श्रीयुत उद्धव ठाकरे आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदी यांच्यावर ‘सौगात  ए मोदी’वरून घसरले. म्हणे, माननीय मोदींचे हिंदुत्व खोटे आहे. बिहार विधानसभा निवडणूक जवळ आली म्हणून मोदींनी  हिंदुत्व सोडले असे यांचे म्हणणे. भाजपाने आपल्या झेंड्यातून हिरवा रंग काढावा असेही ते म्हणतात वा! आपण कोणावर बोलतोय? काय बोलतोय? याचे भान तरी यांना आहे का? भारतीय तिरंग्यात हिरवा रंग का आहे? भाजपाच्या झेंड्यात हिरवा रंग का आहे? याचे या नेत्याला काही ज्ञान नाही. भारतीय ध्वज तीन रंगांचा का आहे, हेही याला कळले नाही. अशा बालिश नेत्याने आमचे जागतिक कीर्तीचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदी यांच्यावर जीभ चालवू नये. हे दीर्घकाळ चालणार नाही लक्षात ठेवा. उद्धव ठाकरे यांनी  आता आपला बाड बिस्तरा गुंडाळावा आणि मातोश्रीत गप्प बसावे. आपले हे काम नाही व ते आपल्याला झेपणार पण नाही.

आमदार आदित्य ठाकरे यांच्याबद्दल तर काही बोलायलाच नको. सगळा आनंदी आनंद आहे. आपल्या कृतीने, कामाने आणि हौसेने यांनी शिवसेना संपवली तरीही यांना त्याचे काहीही वाटत नाही! त्यामुळे आम्ही बोलून काय होणार?

या माझ्या ‘हार आणि प्रहार’मध्ये चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनातील टीकेला मी उत्तर दिले. तथापि काही आमदार नीतिमत्ता सोडून वागत आहेत. त्यांना मला सांगायचे आहे की, ज्या विधिमंडळ इमारतीमध्ये तुम्ही जाता तिथे ग्रंथालयही आहे. ग्रंथालयातही अवश्य जा. या पूर्वीच्या सर्व पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी विविध विषयांवर केलेली भाषणे, त्यांनी दिलेले विचार  आणि ते देताना जोपासलेले संस्कार, प्रथा-परंपरा याचे त्यांनी केलेले पालन तसेच  विधिमंडळ कामकाजाचे नियम हे जरा ग्रंथालयात जाऊन वाचा. सभागृहात केवळ धांगडधिंगा करणे म्हणजे संसदीय कामकाज नव्हे.

या अधिवेशनात ‘विरोधकांची स्थिती नाचता येईना, अंगण वाकडे’ अशी झाली होती. विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांच्यावर विरोधकांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर विश्वासाचा ठराव दाखल करून तो मंजूर करून घेतला. विरोधकांना खरे तर त्यांनी दाखल केलेल्या अविश्वास ठरावाचे पुढे काय होते, याचेही ज्ञान नाही.

विधान परिषदेत भाजपाच्या आमदार चित्रा वाघ, उबाठाचे आमदार, नेते अनिल परब यांना पुरून उरल्या. आमदार चित्रा वाघ यांनी आमदार अनिल परब यांची जी काही ऐशी तैशी करून टाकली, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि आभार.

 हे महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होते. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी अकरावा अर्थसंकल्प यावेळी मांडला. हा अर्थसंकल्प सात लाख वीस हजार कोटींचा. राज्याचा सर्वंकष विकास करणारा असा अर्थसंकल्प त्यांनी मांडल्याचे त्यांच्या भाषणात सांगितले. त्यामुळे आगामी वर्षात सात लाख वीस हजार कोटींच्या अर्थसंकल्पामध्ये भांडवली खर्च पूर्ण करून राज्यात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाहीत. तसेच राज्यातील बेकारी संपेल अशी अपेक्षा यानिमित्ताने मी व्यक्त करतो. यापुढच्या अर्थसंकल्पामध्ये तूट भरून निघून पुढचा अर्थसंकल्प जमेचा अर्थसंकल्प सादर होईल, अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या कार्यकाळात महाराष्ट्र देशात सर्व क्षेत्रांमध्ये अग्रस्थानी राहावा अशा शुभेच्छा देतो.

शेवटी राज्याचे कर्तृत्ववान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेही गुढीपाडव्यानिमित्त अभिनंदन करतो आणि त्यांनाही शुभेच्छा देतो. या निवडणुकीत विरोधकांना कमी केलेत. आता महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या रथ वेगाने कार्यरत करावा, अशा शुभेच्छा आणि अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त करतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -