Friday, May 9, 2025

विदेशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजविडिओ

Bangkok Viral Video : भूकंपाने बँकॉक हादरलं, बाळाच्या जन्मानं तिचं जग बदललं

Bangkok Viral Video : भूकंपाने बँकॉक हादरलं, बाळाच्या जन्मानं तिचं जग बदललं
बँकॉक : थायलंडमध्ये मोठा भूकंप झाला. राजधानी थायलंड आणि आसपासच्या अनेक शहरांमध्ये धक्के जाणवले. जमीन हादरू लागली. इमारतींची पडझड झाली. जो - तो मोकळ्या भूभागाच्या दिशेने धावत सुटला. आरडाओरडा, पळापळ, रडारड यामुळे प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. अनेकांना भीती वाटत होती. या वातावरणात सरकारी रुग्णालयाबाहेर रस्त्यावर एका बाळाचा जन्म झाला. या बाळाच्या जन्माची गोष्ट इतरांपेक्षा एकदम वेगळी आहे.



भूकंपाने इमारत हादरू लागल्यामुळे सरकारी रुग्णालयातून वेगाने रुग्णांना बाहेर मोकळ्या परिसरात आणण्यास सुरुवात झाली. एका महिलेला प्रसूतीसाठी विशेष खोलीत नेले होते. पण भूकंपाने इमारत हादरण्यास सुरुवात होताच तिला तातडीने रुग्णालयाबाहेर आणण्यात आले. गोंधळाच्या आणि भीतीच्या वातावरणात रस्त्यावर प्रचंड गर्दी झाली होती. प्रत्येकाला स्वतःच्या आणि नातलगांच्या जीविताची काळजी वाटत होती. भूकंपामुळे सर्वांसमोर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले होते. या संभ्रमावस्थेच रस्त्यावर प्रचंड गर्दीत महिलेने बाळाला जन्म दिला. परिस्थितीचे भान राखून डॉक्टरांनी सहकाऱ्यांच्या मदतीने बाळाला झटपट कापडात गुंडाळले. यानंतर मातेवर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. मातेला आणि बाळाला तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याचा निर्णय झाला. दोघांना भूकंपामुळे प्रदूषित झालेल्या वातावरणाची बाधा होऊ नये यासाठी पुरेशी खबरदारी घेण्यात आली.



आता बाळ - बाळंतीण सुरक्षित आणि सुखरुप आहेत. डॉक्टरांनी पुरेशी खबरदारी घेतल्यामुळे दोघांना कसलाही संसर्ग (इन्फेक्शन) झालेला नाही. बँकॉकमध्ये मदतकार्य सुरू आहे. अभियंत्याकडून परवानगी मिळाल्यानंतरच रुग्णालयाच्या इमारतीचा वापर पुन्हा केला जाईल. सध्या एका सुरक्षित ठिकाणी बाळ - बाळंतीण यांची वैद्यकीय पथक देखभाल करत आहे.

आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, भूकंपामुळे म्यानमारमध्ये एक हजारपेक्षा जास्त मृत्यू झाले असून २३७६ पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. थायलंडमध्ये भूकंपामुळे १० मृत्यू झाले असून ६८ जण जखमी झाले आहेत. चीनमध्ये भूकंपामुळे दोन जण जखमी झाले आहेत. भारताने ऑपरेशन ब्रह्मा अंतर्गत भूकंप पीडितांसाठी मदतकार्य सुरू केले आहे.
Comments
Add Comment