सुप्रिया सुळेंचे नाव न घेता अजित पवारांनी फटकारले
पुणे : ‘सेल्फी’ घेऊन आणि फोटो काढून प्रश्न सुटत नसतात, त्यासाठी काम करावे लागते. कामातील ज्ञान असावे लागते, अधिकाऱ्यांवर दबदबा असावा लागतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता त्यांना चांगलेच फटकारले.
माळेगाव साखर कारखान्यावर आयोजित शेतकरी मेळाव्यामध्ये बोलताना पवार यांनी कारखान्याची निवडणूक नजीकच्या काळात लागण्याची शक्यता असल्याचे सूतोवाच केले, या मेळाव्यामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने पवारांनी विरोधकांवर केलेली फटकेबाजी पहावयास मिळाली. या वेळी पवार म्हणाले, अजित पवारांमुळे माळेगाव आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना कमी पैसे दिले असे विरोधक म्हणतात, परंतु सोमेश्वरचा ऊसदर काढताना मी माझे मत मांडतो, माळेगावचा ऊसदर काय निघतो? किती निघतो? हे मी पाहत नाही. माळेगावसह सोमेश्वर या दोन्हींचे मी नेतृत्व करतो, त्यामुळे मी कधीही चुकीच्या पद्धतीने वागून संस्था अडचणीत आणणार नाही. ज्यावेळी मला वाटेल की आता मला संस्था चालवता येत नाही, त्यावेळी मी सभा घेऊन सांगेन की आता मला जमत नाही. बारामती तालुक्यासाठी केवळ मागील शंभर दिवसांत १००० कोटी रुपयांचा निधी आणला आहे, यामध्ये जानाई शिरसाई जलसिंचन योजना, शिक्षण क्षेत्रातील मोठे काम तर मूलभूत सुविधा आदींचा समावेश आहे. माझ्यासारखा आमदार तुम्हाला इथून पुढे मिळणार नाही. मी उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री आहे. तसेच सहकारमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे, त्यामुळे साखर कारखानदारीला मदत माझ्याकडूनच मिळणार आहे, असेही अजित पवारांनी ठणकावले.
IPL 2025: साई सुदर्शनची धमाकेदार खेळी, गुजरातचे मुंबईला इतक्या धावांचे आव्हान
ज्येष्ठ नेते शरद पवार यांचेही नाव न घेता अजित पवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्याशी माझी जवळीक आहे. केंद्रात किंवा राज्यात काही काम असेल तर ते माझ्यामार्फतच होईल. सहकार खात्यातील कामांबाबत इतर नेत्यांकडे फारसा प्रभाव नसल्याची टीका करत कारखान्याचा हजारो कोटींचा आयकर केवळ अमित शहा यांच्यामुळे माफ झाला, हे पूर्वी का झाले नाही? असा थेट सवाल करत त्यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर टीका केली.