कणकवली : डीपीडिसी निधी खर्चात सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात ३१ मार्चपूर्वी प्रथम क्रमांकावर असून एकूण २५० कोटींपैकी ९८% निधी खर्च झाल्याची माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली येथील पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा प्रशासनात आर्थिक शिस्त आणण्यासाठी पावले उचलून जिल्हा विकासाचा निधी पूर्ण खर्चुन जिल्हा विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर सांगितले होते. मागील वर्षीचा २५० कोटींचा निधी खर्च करण्याचे नियोजन केले. सोमवारी ३१ मार्च असून आज २५० कोटीपैकी ९८% निधी खर्च झाल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
राज्य पातळीवर जिल्हा नियोजन निधी खर्चाबाबत राज्य सरकारच्या वेबसाईटमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या खर्चाची माहिती नमूद आहे. १८ जानेवारीला पालकमंत्री झालो तेव्हा जिल्हा निधी खर्चात ३२ व्यां क्रमांकावर होता आणि आता आपण राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याची गोड बातमी गुढीपाडव्या आधी पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यासाठी जिल्हाधिकारी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन अधिकारी यांचे पालकमंत्री म्हणून अभिनंदन करतो. त्यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन सिंधुदुर्ग विकासासाठी घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे असे ते म्हणाले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, संदीप साटम, माजी नगराध्यका समीर नलावडे उपस्थित होते.
मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांची ‘दिलखुलास’ ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत
जिल्हा विकासाला आर्थिक शिस्त लावण्यासाठी हे सकारात्मक पाऊल आहे. असे असले तरी शेवटच्या दोन महिन्यांत निधी खर्च केला जातो ते योग्य नसून पुढील वर्षीपासून १५ एप्रिल आधीच डीपिडीसी बैठक घेतली जाईल. ३०० कोटींचा निधी आराखडा डिसेंबर २०२५ पर्यंत खर्च करण्यासाठी नियोजन केले जाईल नंतर जानेवारी महिन्यात आणखी १०० कोटी विकासनिधी राज्याकडे मागितला जाईल. ज्या अधिकाऱ्यांनी जिल्हा विकास निधी खर्च करण्यात कसूर केली त्यांना योग्य समज दिली आहे. सिंधुदुर्गवासीयांचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी आवश्यक सेक्टर मध्ये निधी उपलब्ध करून दिला आहे. कुपोषणमुक्त जिल्हा म्हणून सिंधुदुर्गचे नाव येण्यासाठी आम्ही पावले उचलत आहोत. यासाठी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी हे सक्रीय मेहनत घेत आहेत.
उद्धव ठाकरेंनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये : मंत्री नितेश राणे
खासदार नारायण राणे यांनी जिल्ह्याला विकासाच्या वाटेवर नेले. माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा विकासाची जबाबदारी पार पाडली. आता सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी मी कटिबद्ध आहे. या माध्यमातून जिल्हावासीयांचे राहणीमान सुधारेल. पर्यटन क्षेत्रात अधिकची गुंतवणूक होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नरडवे धरणग्रस्तांना आर्थिक पॅकेजचे वितरण सुरू होईल आणि दुसऱ्या बाजूने नरडवे धरणाचे बंद असलेले काम ह्याच हंगामात सुरू होईल असेही पालकमंत्री राणे यांनी सांगितले. जिल्ह्यातील नद्यांमधील गाळ काढण्याचा उपक्रम सुरूच राहणार असल्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे म्हणाले.