मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे. ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत सोमवार दि. ३१ मार्च २०२५ रोजी तसेच, मंगळवार दि. १ आणि बुधवार दि. २ एप्रिल२०२५ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. १ एप्रिल २०२५ रोजी रात्री ८.०० वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत पाहता येणार आहे. निवेदक संजय भुस्कुटे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाच्या माध्यमातून पर्यावरण संतुलनासह शास्वत मत्स्यपालन विकास करण्यासाठी शासनस्तरावर विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी दोन्ही विभागाच्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे, मच्छिमारांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावणे, स्वच्छ व प्रथिनयुक्त पोषक अन्नाचा पुरवठा करणे आणि ग्रामरोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्याबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असल्याचे, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगितले आहे.
महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक व आर्थिक विकासात मत्स्यव्यवसाय विभागाचा महत्वाचा वाटा आहे. आर्थिकदृष्टया मागासलेल्या लोकांकरिता रोजगार मिळण्यासाठी मत्स्यव्यवसाय क्षेत्र हा महत्वाचा स्त्रोत आहे. विविध क्षेत्रात आधुनिक प्रामाणित तंत्रज्ञान आत्मसात करुन मत्स्यव्यवसायाचा विकास करणे यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच राज्याच्या किनारपट्टी भागात होत असलेला औद्योगिक विकास लक्षात घेता बंदरांना जास्तीतजास्त सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीकोनातून या बंदरांचा विकास करण्याला प्रोत्साहन देण्यात येत असून यासाठी वेळोवेळी धोरणात्मक निर्णय घेण्यात येत आहे. त्याअनुषंगाने मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागांतर्गत घेण्यात आलेले धोरणात्मक निर्णय आणि त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे सुरू आहेत, याविषयी मंत्री राणे यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.