नाशिक : अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुटवड नगर परिसरात एका महिलेने मुलांची परीक्षा सुरू असल्यामुळे स्पीकरचा आवाज कमी करण्याची विनंती केली. मात्र, यामुळे संतापलेल्या तरुणाने तिच्या घरावर दगडफेक करत वाहनांची तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुटवड नगर पोलीस चौकीसमोरील वेणु नगर भागात पुनित बन्सल हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांच्याच घराच्या मागे कुंवर नावाचा तरुण (वय २५ वर्षे) राहतो. सध्या बन्सल यांच्या मुलीची परीक्षा सुरू असल्याने ती अभ्यासात मग्न होती. मात्र, याच दरम्यान, कुंवरने आपल्या घरातील स्पीकर मोठ्या आवाजात लावला होता.
स्पीकरच्या मोठ्या आवाजामुळे मुलीच्या अभ्यासात व्यत्यय येत असल्याने तिने आपल्या आईकडे तक्रार केली. त्यानंतर बन्सल यांच्या पत्नीने कुंवरला स्पीकरचा आवाज कमी करण्याची विनंती केली. मात्र, या गोष्टीचा राग आल्याने कुंवरने बन्सल यांच्या घरात घुसून साहित्याची नासधूस केली. तसेच घरातील लहान मुलांची सायकल आणि बाहेर लावलेली दुचाकी रस्त्यावर फेकून दिली.
यावरही न थांबता, कुंवरने संतापाच्या भरात बन्सल यांच्या घरावर दगडफेक केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेनंतर पुनित बन्सल यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी धाव घेतली. अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राकेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, परीक्षेच्या काळात होत असलेल्या अशा घटनांमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पोलीस प्रशासनाने त्वरित कारवाई करत आरोपीला अटक करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.