मुंबई : विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांच्याविरोधात महाविकास आघाडीने एकजूट होत अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी केली होती. शिंदे यांच्यावर पक्षपाती कारभार करत असल्याचा आरोप करत विरोधकांनी सभागृहात या मुद्द्याला उचलून धरले होते. यासंदर्भात अधिकृत पत्रही देण्यात आले होते. मात्र, या प्रस्तावाबाबत आता मोठी घडामोड समोर आली असून, ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी हा प्रस्ताव मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे.
विरोधकांचा आरोप आणि मागणी
विरोधी पक्ष हा संसदीय प्रणालीतील महत्त्वाचा घटक असून, सरकारच्या निर्णयांवर अंकुश ठेवणे आणि पर्यायी धोरण सुचवणे हे त्याचे प्रमुख कार्य आहे. मात्र, महाराष्ट्र विधानपरिषद आणि विधानसभा सभागृहात सभापती आणि अध्यक्ष पक्षपाती व एकांगी भूमिका घेत आहेत, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला होता.
Nashik News : नाशिकमध्ये स्पीकरचा आवाज कमी करण्यास सांगितल्याने तणाव; दगडफेक, वाहनांची तोडफोड
या संदर्भात राज्यपालांना पत्र देऊन विधानसभेच्या कार्यवाहीत संसदीय परंपरांचे पालन न करता नियमबाह्य पद्धतीने कामकाज चालवले जात असल्याची तक्रार करण्यात आली होती. विरोधी पक्षाच्या सदस्यांना सभागृहात बोलण्यास संधी दिली जात नाही, त्यांच्या हक्कांचे संरक्षण केले जात नाही, असा आरोप देखील करण्यात आला होता.
अविश्वास प्रस्ताव मागे घेण्यामागचे कारण
परंतु, आता महाविकास आघाडीने हा प्रस्ताव मागे घेतला आहे. अंबादास दानवे यांनी २१ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या सविस्तर चर्चेनंतर हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना समाधानकारक आश्वासन दिले असल्याने सभागृहात खेळीमेळीचे वातावरण टिकावे, यासाठी प्रस्ताव मागे घेत असल्याचे दानवे यांनी पत्रात नमूद केले आहे. या पत्रावर अनिल परब, भाई जगताप, सचिन अहिर, एकनाथ खडसे, सुनील शिंदे, प्रज्ञा सातव यांच्यासह अनेक आमदारांच्या सह्या आहेत.