Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

गुढीपाडव्यापासून व्यावसायिक गाड्यांवरील संदेश मराठीतूनच

गुढीपाडव्यापासून व्यावसायिक गाड्यांवरील संदेश मराठीतूनच

मंत्री प्रताप सरनाईकाचे परिवहन विभागाला निर्देश


मुंबई : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर आता राज्यात मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार सर्वत्र झाला पाहिजे यासाठी राज्य सरकार पावले उचलत आहे. प्रत्येक शाळेत मराठी भाषा सक्तीची केली आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळेतही मराठी भाषा शिकवणे बंधनकारक असणार आहे. दरम्यान, आता वाहनांबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील व्यावसायिक वाहनांवर लिहिण्यात येणारे संदेश हे मराठीत असावेत, असे निर्देश राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी परिवहन विभागाला दिले आहेत.


मराठी ही राज्याची अधिकृत राज्य भाषा आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मराठी भाषेचे संवर्धन करणे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे. त्यासाठीच राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात नोंदणी असलेल्या व्यावसायिक वाहनांवर सामाजिक संदेश, जाहिरात किंवा जनजागृती करणारी वाक्ये लिहिलेली असतात. बहुतांशवेळा ही वाक्ये इंग्लिश हिंदीमध्येही असतात. त्यामुळे मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारावर बंधने येतात. पण आता यापुढे अशी वाक्ये मराठी भाषेतच लिहावी. यामुळे राज्यातल्या जनतेला अधिक उपयुक्त माहिती मिळेल आणि भाषेचाही प्रचार-प्रसार होईल असं मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.


व्यावसायिक वाहनांमध्ये ट्रॅक्टर, ट्रक किंवा व्यवसायाच्या उद्देशाने खरेदी केलेल्या वाहनांचा समावेश आहे. परिवहन खात्याच्या कार्यालयांमध्ये असणाऱ्या वाहनांवरही मराठीत संदेश लिहिणे बंधनकारक असणार आहे. येत्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. राज्यात नोंदणी असलेल्या सर्व व्यावसायिक वाहनांवर असणारे सामाजिक संदेश हे मराठी भाषेत लिहावे. याबाबत मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन आयुक्तांना निर्देश दिले आहेत.

Comments
Add Comment