केरळ : केरळमधील पुनलुर स्थानकावरुन रेल्वे संरक्षण दलाच्या (Railway Protection Force or RPF) जवानांनी दोन जणांना अटक केली आहे. रेल्वेतून नोटांची तस्करी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. अटक केलेल्यांकडून नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त केलेल्या नोटा खऱ्या आहेत की खोट्या याची तपासणी सुरू आहे. आरोपींकडून ५०० रुपयांच्या नोटांच्या स्वरुपात एकूण ४४ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.
पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये तयार केलेल्या बनावट भारतीय नोटा वेगवेगळ्या मार्गाने भारतात पाठवण्याचा प्रयत्न सुरू आहे. याआधी उत्तर प्रदेशमधील अलीगड येथे एसओजी आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करुन तीन जणांना अटक केली. अटक केलेल्यांकडून ५०० रुपयांच्या नोटांच्या स्वरुपात एकूण ७७ हजार रुपये जप्त करण्यात आले. या सर्व बनावट नोटा असल्याचे लक्षात आले. यामुळे केरळमध्ये अटक केलेले दोघे बनावट नोटा घेऊन जात होते की कोणाचा काळा पैसा सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी तस्करांची मदत घेतली जात होती, याचा तपास सुरू आहे.
केरळमध्ये अटक केलेल्या मुत्थु (५८) आणि अलगप्पन (५८) या दोघांची चौकशी सुरू आहे. अटक केलेले दोघे मदुराईचे निवासी आहेत. दोघांना जप्त केलेल्या नोटांप्रकरणी पोलिसांना समाधानकारक माहिती देता आलेली नाही. मुत्थु आणि अलगप्पन या दोघांनी कंबरेजवळ कापडात गुंडाळून नोटा बांधून ठेवल्या होत्या. आरपीएफच्या जवानांनी गर्दीत उभे राहून गाडीत चढत असताना या दोघांना अडवले आणि चौकशी केली. अंगझडती घेतली त्यावेळी दोघांनी कंबरेजवळ कापडात गुंडाळून ठेवलेल्या नोटा आढळल्या आहेत. या प्रकरणी तपास सुरू आहे.