मुंबई : ट्रेडबायनरी या आघाडीच्या तंत्रज्ञान आणि कन्सल्टिंग कंपनीने महाराष्ट्रातील दापोलीमध्ये आयटी तज्ज्ञ तयार करण्यासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) अंतर्गत हा उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातल्या तरुणांना आयटी क्षेत्रातील रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तसेच दापोली तालुक्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. दापोली मॉडेल यशस्वी झाले तर ट्रेडबायनरी कंपनी भारतातील ग्रामीण भागाला जागतिक आयटी क्षेत्रामध्ये पॉवरहाऊस बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम करणार आहे.
ट्रेडबायनरी कंपनी शहर आणि ग्रामीण भागातील गुणवंतांमधील फरक कमी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. हा उपक्रम आयटी विकेंद्रीकरणासाठी स्केलेबल मॉडेल आहे, जो भारतातील डिजिटल कर्मचारीवर्ग क्रांतीसाठी उदाहरण निर्माण करेल असा विश्वास ट्रेडबायनरीचे संस्थापक व संचालक असलेल्या युवराज शिधये आणि दर्शिल शाह या दोघांनी व्यक्त केला.