Tuesday, April 29, 2025

महामुंबईमहाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

MSRTC : एसटी महामंडळात बदल्या होणार सुपरफास्ट

MSRTC : एसटी महामंडळात बदल्या होणार सुपरफास्ट मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (Maharashtra State Road Transport Corporation or MSRTC) अर्थात एसटी महामंडळात अनेक वर्षे एकाच ठिकाणी अधिकारी असल्यामुळे कारभारात अपेक्षित गतिमानता येत नाही, अशी ओरड होऊ लागली आहे. याची गंभीर दखल घेत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळात सुपरफास्ट बदल्या करण्याचे नियोजन केले आहे. एसटी महामंडळात एकाच मुख्यालयात तीन वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या तातडीने बदल्या करण्याचे आदेश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाला सोमवारी दिले. यामुळे राज्यातील सुमारे एक हजार अधिकाऱ्यांची बदली होणार आहे. या बदल्यांचे आदेश लवकरच जारी होणार असल्याचे वृत्त आहे.
एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात कामगार संघटनांनी सरनाईक यांची भेट घेतली. यावेळी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार उपस्थित होते. याप्रसंगी झालेल्या चर्चेत अधिकाऱ्यांचा मुद्दा आला. अधिकारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी असल्यामुळे निवडक कर्मचाऱ्यांशी हितसंबंध निर्माण होणे, तून आर्थिक गैरव्यवहारांची शक्यता वाढणे, महामंडळाच्या कामांव्यतिरिक्त अन्य कामांसाठी हितसंबंधांचा गैरवापर करणे असे प्रकार सुरू होतात. यामुळे सामान्य कर्मचाऱ्यांवर अन्याय होतो. एसटी महामंडळाच्या सेववर प्रतिकूल परिणाम होतो. यामुळे एकाच मुख्यालयात तीन वर्षांपेक्षा जास्त वेळ कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने बदली करावी, असे निवेदन आमदार पडळकर यांनी दिले. अधिवेशन संपल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून बदल्यांबाबत योग्य निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन सरनाईक यांनी दिले. यानंतर बदल्यांचे नियोजन सुरू झाले आहे.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसटी महामंडळाच्या १३१० बस खरेदी करण्याच्या निविदेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर सुपरफास्ट बदल्यांचे नियोजन झाले.
Comments
Add Comment