मुंबई : राज्यात सीईटी परीक्षेत मोठा घोटाळा (CET Exam Scam) उघडकीस आला असून एका पेपरमध्ये टक्केवारी वाढवून देण्यासाठी तब्बल २२ लाख रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचे समोर आले आहे.याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून, गुन्हेगार उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या परराज्यातील असल्याची धक्कादायक माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिली.
सीईटी कक्षातर्फे एमबीए, एमएमएस आणि अभियांत्रिकीसह विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्यात आली होती. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते. दरम्यान, दोन विद्यार्थ्यांनी स्पॅम कॉलद्वारे मार्क वाढवून देण्याचे आमिष दाखवण्यात आल्याची तक्रार दिली. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तत्काळ समिती नेमून चौकशीचे आदेश दिले.
चौकशी अहवालात आर्थिक व्यवहाराचे पुरावे समोर आले असून या रॅकेटचा फैलाव देशभरात असल्याचे स्पष्ट असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. एका पेपरमध्ये टक्केवारी वाढवून देण्यासाठी प्रत्येकी २२ लाख रुपये घेण्यात आल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी आतापर्यंत चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या रॅकेटचा अधिक तपास सुरू असून प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचेही पाटील यांनी सांगितले.