ठाणे : ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्या स्वीय सहाय्यक या पदावर कार्यरत असणाऱ्या पल्लवी सरोदे (वय ३७ वर्ष) यांचे रविवार २३ मार्च रोजी सकाळी हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर अपघाती निधन झाले. कार्यालयीन मैत्रिणींसह त्या हरिहरेश्वर या ठिकाणी सहली निमित्त गेल्या होत्या. तेथील समुद्रकिनारी त्या लाटेत अचानक ओढल्या गेल्या, त्यात त्यांचा मृत्यू झाला.
पल्लवी सरोदे या ठाणे जिल्हा प्रशासनात २०१२ रोजी लिपिक या पदावर रुजू झाल्या होत्या. मार्च २०२४ मध्ये त्यांना सहाय्यक महसूल अधिकारी पदावर पदोन्नती मिळाली होती. त्या सध्या जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत होत्या. पल्लवी सरोदे यांच्या पश्चात त्यांचे पती, सासू – सासरे आणि मुलगा असा परिवार आहे.