नागपूर : नागपूर पोलिसांनी रविवार २३ मार्च २०२५ रोजी दुपारी तीन वाजल्यापासून कोतवाली, गणेशपेठ, यशोधरानगर आणि तहसीलसह सर्व संचारबंदी असलेल्या भागांमधून संचारबंदी हटवली आहे. याआधी १७ मार्च रोजी शहरात उसळलेल्या हिंसाचारानंतर नागपूरचे पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल यांनी संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या १० पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू केली होती. आता परिस्थिती नियंत्रणात आल्याने आणि शांतता प्रस्थापित झाल्याने संपूर्ण शहर संचारबंदी मुक्त झाले आहे.
संचारबंदीच्या काळात संबंधित भागांतील सर्व दुकानं, बाजारपेठा, शाळा आणि व्यावसायिक आस्थापनांना बंद ठेवले होते. सततच्या बंदमुळे सामान्यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. अखेर परिस्थिती नियंत्रणात आल्यावर पोलिसांनी संचारबंदी हटवली आहे. यामुळे नारिकांना दिलासा मिळाला आहे.
याआधी संचारबंदीच्या काळात परिस्थिती थोडी नियंत्रणात आल्यावर गणेशपेठ, कोतवाली आणि तहसील भागात नागरिकांना सकाळी ७ ते १० या वेळेत आवश्यक वस्तू खरेदीसाठी सवलत देण्यात आली होती. मात्र, यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी कायम होती. नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी होती. रविवारी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर नागपूर पोलिसांनी संपूर्ण शहरातून संचारबंदी हटवली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, शांतता ठेवावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
नागपुरातील हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत १०४ दंगलखोरांची ओळख पटली असून, त्यापैकी ९२ जणांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित १२ अल्पवयीन आरोपींवर कायद्यानुसार कारवाई सुरू आहे. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि इतरांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवरही कारवाई सुरू आहे. दंगल करुन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांकडूनच दंड रुपाने वसुली करुन सरकार हानीची भरपाई करणार आहे. ज्यांची दंड देण्याची ऐपत नाही अशा आरोपींची मालमत्ता विकून त्यांच्याकडून दंड वसूल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.