कॅलिफोर्निया : अमेरिकेतील डिस्नेलँड फिरवून आणल्यानंतर जन्मदात्या आईनेच पोटच्या पोराची हत्या केली. आईने धारदार चाकूने ११ वर्षीय मुलाचा गळा चिरला. ही धक्कादायक घटना कॅलिफोर्निया प्रांतातील ऑरेंज काउंटी जिल्ह्यात घडली. या प्रकरणात मुलाची आई सरिता रामराजू (४८) हिला अटक करण्यात आली आहे. सध्या सरिता विरोधात कायदेशीर कारवाई सुरू आहे. मुलाच्या हत्येप्रकरणी दोषी असल्याचे सिद्ध झाल्यास सरिताला कमाल २६ वर्षांची शिक्षा होऊ शकते.
Burger King India : बर्गर किंग इंडियाची देशभरात किती रेस्टॉरंट्स आहेत? जाणून घ्या
नेमके काय आहे प्रकरण ?
सरिताने २०१८ मध्ये घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर कॅलिफोर्निया प्रांतातील तिच्या घरात राहू लागली. मुलाचा ताबा वडिलांना मिळाला होता. पण अधूनमधून मुलाला भेटण्याचे स्वातंत्र्य सरिताला मिळाले होते. या निर्णयानुसार सरिताने मार्च महिन्यात मुलाची भेट घेण्याचा निर्णय घेतला. मुलासोबत डिस्नेलँड फिरुन येण्यासाठी तिने पास काढले. ट्रिपची माहिती माजी पतीला दिली. वडिलांनी मुलाला डिस्नेलँडला घेऊन जाण्यासाठी परवानगी दिली. यानंतर सरिता आणि मुलगा डिस्नेलँड फिरण्यासाठी गेले. ते दोघे फिरुन आल्यावर सांता एनामधील एका मोटल अर्थात छोटेखानी हॉटेलमध्ये उतरली होती. ठरल्याप्रमाणे सरिता मुलाचा ताबा १९ मार्च रोजी त्याच्या वडिलांकडे देणार होती. पण त्याच दिवशी सकाळी नऊ वाजून बारा मिनिटांनी सरिताने स्थानिक पोलिसांना फोन केला आणि मुलाची हत्या केल्याचे सांगितले. आत्महत्या करण्यासाठी गोळ्या घेत आहे, असेही ती म्हणाली. सरिताने फोन कट करताच तातडीने पोलीस पथक मोटलवर येऊन धडकले. त्यांनी मोटल स्टाफच्या मदतीने सरिताची खोली उघडली. खोली उघडली त्यावेळी तिथे एका बाजूस सरिताचा ११ वर्षीय मुलगा मृतावस्थेत आढळला आणि त्याची जन्मदाती आई बेशुद्धावस्थेत दिसली.
पोलिसांनी सरिताला ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले तसेच मुलाला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी मुलाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. यानंतर मुलाचे पोस्टमॉर्टेम करण्यात आले. वैद्यकीय उपचारांनी शुद्धीत आल्यावर पोलिसांनी सरिताला चौकशीसाठी अटक केली आहे. सध्या सरिता पोलीस कोठडीत आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस पोहोचण्याच्या काही तास आधीच मुलाची हत्या झाली होती. ही माहिती मिळाल्यानंतर हत्येचे कारण जाणून घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.