मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणा शिवजयंती दिनी केली होती. अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यातही आग्र्यातील भव्य स्मारकाची तरतूद करण्यात आल्याचे दिसून आले. आग्र्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या स्मारकाच्या उभारणीसाठी कार्यान्वयीन व निधीची जबाबदारी राज्याच्या पर्यटन विभागाकडे देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे भव्य स्मारकाच्या उभारणीस येत्या काळात गती लाभणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातील ज्या ठिकाणी कैद राहिलेले ती जागा महाराष्ट्र सरकार उत्तर प्रदेश सरकारकडून अधिग्रहित करणार आहे. या जागेवर शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारले जाणार असून आग्र्यातील शिवरायांची गाथा सांगणारे संग्रहालयही या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या पर्यटन विभागाकडून स्मारकासाठी आर्थिक तरतूद केली जाणार आहे. स्मारक उभारणीसाठी पर्यटन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली इतिहास तज्ज्ञ, जाणकार तज्ज्ञांची समिती स्वतंत्रपणे स्थापन करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी निधी उपलब्धता, जमीन अधिग्रहण व अानुषंगिक बाबींकरिता पर्यटन विभागाला जबाबदारी
देण्यात आली आहे. या विभागातंर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून काम पाहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळराजे शंभुराजे यांची आग्र्यातून सुटका आणि महाराजांच्या पराक्रमाच्या गौरवगाथेचे स्मरण पुढील पिढ्यांसाठी करून देण्यासाठी हे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.