नवी दिल्ली (वृत्तसंस्था): इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेला शनिवारपासून सुरुवात झाली आहे. पहिला सामना कोलकातामधील ईडन गार्डन्स स्टेडियमध्ये गतविजेते कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात झाला आहे. या सामन्यापूर्वी आयपीएलच्या या १८ व्या हंगामाचा चमकदार उद्घाटन सोहळा पार पडला. नेहमीप्रमाणे या हंगामाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी अनेक सेलिब्रेटीची उपस्थिती होती. त्यांचा चमकदार परफॉर्मन्सही स्टेडियममधील प्रेक्षकांसह टीव्ही आणि ओटीटीवर पाहाणाऱ्या चाहत्यांनाही पाहायला मिळाला आहे. आयपीएलच्या १८ व्या हंगामाची सुरुवात बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान, गायक श्रेयाल घोषाल आणि करण औजला आणि बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी यांच्या उपस्थितीत एका शानदार उद्घाटन समारंभाला प्रारंभ झाला.
विराट कोहली शाहरुखच्या गाण्यावर थिरकला
उद्घाटन समारंभात शाहरुख खानने विराट कोहलीला डान्स करण्याची विनंती केली. दोघांनीही पठाण चित्रपटातील ‘झूमे जो पठाण’ गाण्यावर नाच करून प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर शाहरुखने बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना आणि कलाकारांना स्टेजवर बोलावले. आयपीएलच्या १८ हंगामांच्या पूर्ततेबद्दल बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी विराट कोहलीला स्मृतिचिन्ह भेट दिले. उद्घाटन समारंभाच्या शेवटी, आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार आणि केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे ट्रॉफी घेऊन मंचावर आले.
आतषबाजीने झाले आयपीएल २०२५ चे उद्घाटन
श्रेया घोषालने तिच्या सुरेल आवाजाने चाहत्यांना मंत्रमुग्ध केले. तिने काही देशभक्तीपर गीते सादर केली. तसेच दिशा पटानीने तिच्या नृत्याने सर्वांना घायाळ केल्याचे पाहायला मिळाले. याशिवाय करण औलिजाने पंजाबी तडक्यासह गाणी सादर केली. याशिवाय मैदानात नंतर लाईट शो देखील पाहायला मिळाला.
श्रेया घोषालने सादर केलेल्या पुष्पा २ मधील गाण्यावर कोलकातावासी थिरकले. यानंतर, बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीने नृत्य लक्षवेधी ठरले. पंजाबी गायक करण औजला यांनी कार्यक्रमात रंगत आणली.शाहरुखने रिंकू सिंग आणि विराट कोहलीसोबत नाच केला. गतविजेत्या केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार हे चमकदार आयपीएल ट्रॉफीसह मंचावर आले. शाहरुखसोबत स्टेजवर बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी, दिशा पटानी, श्रेया घोषाल, करण औजला, रहाणे आणि पाटीदार होते. आयपीएलच्या १८ व्या हंगामानिमित्त केक कापण्यात आला आणि आयपीएल २०२५ चे उद्घाटन आतषबाजीने करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीत गायले गेले.