‘पान जागे फूल जागे,
भाव नयनीं जागला
चंद्र आहे साक्षीला!
प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी गायलेले, सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेली गाणी आज आठवली. निमित्त ठरले, भारतीय वंशाच्या अमेरिकी अंतराळयात्री सुनीता विलियम्स अखेर २८६ दिवसांनंतर पृथ्वीवर परतल्या. भारतीय वेळेनुसार बुधवारी पहाटे ३.२७ वाजता अमेरिकेतील फ्लोरिडाच्या समुद्रात स्पेसक्राफ्ट उतरले आणि त्यानंतर आता जगभरात सुनीता विलियम्स सुखरूप परतल्याची चर्चा सुरू झाली आहे. अंतराळात या नऊ महिन्यांच्या प्रवासात सुनीता विलियम्स या काय करत होत्या. कशा राहिल्या असतील, याबद्दल प्रत्येक भारतीयांच्या मनात एक उत्कंठा आहेच. पण, चंद्रावर पाय ठेवणाऱ्या अंतराळवीरानंतर, संशोधन करण्यासाठी गेलेल्या सुनीता विलियम्स यांची टीम काय करत आहे, याची चर्चा पृथ्वीभोवती फिरणाऱ्या चंद्रासह अन्य ग्रहांनाही असणार, अशी कल्पना केली तर त्यात वावगे ठरणार नाही. हिंदू धर्मग्रंथात या ग्रहांना देवतेचा मान दिलेला असला तरी, वैज्ञानिकदृष्टीने अंतराळात गेलेली सुनीता सुद्धा श्रद्धाळू होती, हे लपून राहिलेले नाही. तिने आपल्यासोबत गणपतीची मूर्ती नेली होती. रामाचे स्मरण ती नेहमी करते, असे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
सुनीता विलियम्स यांच्या वडिलांचे नाव दीपक पंड्या. गुजरातमधील मेहसाणा गावाचे ते रहिवासी. पंड्या यांनी अहमदाबाद येथून डॉक्टरकीचे शिक्षण घेतल्यानंतर थेट अमेरिका गाठली. येथेच त्यांनी स्लोवेनियाई वंशाच्या महिलेशी लग्न केले. यानंतर या दाम्पत्यांच्या पोटी सुनीता यांचा जन्म झाला. लहानपणी सुनीता यांना प्राण्यांबाबत ओढा होता. याच कारणामुळे आपण जनावरांचे डॉक्टर व्हावे अशी त्यांची इच्छा होती. पशुवैद्यक अभ्यासक्रमासाठी त्यांनी अर्जही केला होता. पण, त्यांना आवडीचे कॉलेज मिळाले नव्हते. यानंतर सन १९८३ मध्ये त्यांनी थेट अमेरिकेतील नौदलात प्रवेश घेतला. १९८७ मध्ये भौतिक विज्ञानाची पदवी घेतली. ही पदवीच सुनीता विलियम्स यांच्या यशाची पहिली पायरी ठरली. नौदलातील प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या एक पायलट झाल्या आणि अनेक प्रकारची विमाने उडवली. याच दरम्यान त्यांना जॉन्सन स्पेस सेटरमध्ये जाण्याची संधी मिळाली. या प्रसंगाने सुनीता यांच्या करिअरला वेगळीच कलाटणी मिळाली. या ठिकाणी त्यांची भेट अंतराळ यात्री जॉन यंग यांच्याशी झाली. जॉन यंग चंद्रावर जाणारे नववे व्यक्ती होते. सुनीता खूप प्रभावित झाल्या. यानंतरच त्यांनी एक एस्ट्रोनॉट बनण्याचा निर्णय घेतला. जॉन यंग यांच्या भेटीनंतर सुनीता विलियम्स यांनी अंतराळ यात्री होण्यासाठी नासात अर्ज केला होता; परंतु त्यांचा अर्ज नाकारला होता. यानंतर सन १९९५ मध्ये त्यांनी फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतून इंजिनीअरींगची मास्टर डिग्री घेतली होती. यानंतर पुन्हा नासात अर्ज केला. यावेळी मात्र नासाने त्यांची निवड केली. पण अंतराळात जाण्यासाठी सुनीता विलियम्स यांना बराच काळ वाट पाहावी लागली होती. आठ वर्षांनंतर म्हणजेच २००६ मध्ये त्यांना पहिल्यांदा अंतराळात जाण्याची संधी मिळाली होती.
आता दुसऱ्या मिशनमधून अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर तब्बल ९ महिन्यांनंतर सुरक्षित पृथ्वीवर परतले आहेत. ५ जून रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर दोघे पोहोचले होते. मात्र त्यानंतर तांत्रिक अडचणींमुळे त्यांना ९ महिने तिथेच राहावे लागले. या कालावधीत तिने अवकाशातून महाकुंभ सोहळा पाहिला. सुनीता विलियम्स यांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभमेळ्याचा फोटो कुटुंबीयांना पाठवला होता. तसेच या मोहिमेदरम्यान त्यांनी ९०० तासांचे संशोधन आणि १५० हून अधिक प्रयोग केले आहेत. भारतातील तिच्या पूर्वजांच्या गावात सर्वचजण देव पाण्यात ठेवून त्यांच्या येण्याची वाट पाहत होते. ती सुखरूप परत यावी म्हणून तिच्या झुलासन या मूळ गावात यज्ञ आणि पूजा आयोजित केली होती. आज अमेरिकेतच नव्हे तर भारतातही उत्साहाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी सुनीता विलियम्स यांना खास पत्र पाठवून त्यांचे कौतुक केले आहे. अमेरिकेच्या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत सुनीता विलियम्स यांच्या स्थितीबद्दल चर्चा केली होती. “१.४ अब्ज भारतीय तुमच्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगतात. तुमच्या जिद्दीने संपूर्ण जगाला प्रेरणा मिळाली आहे,” असे पंतप्रधान मोदी यांनी सुनीताला उद्देशून लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. तसेच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडेन प्रशासनावर टीका करत हे अंतराळवीर संकटात टाकल्याचा आरोप केला. मात्र, व्हाईट हाऊसने शब्द पाळल्यामुळे या यशस्वी मिशनचे श्रेय ट्रम्प यांना दिले आहे.
आता सुनीताची घरवापसी झाली आहे. तिला तिच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वेळ द्यायला हवा. दीर्घकाळ अंतराळात राहिल्याने सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांना अनेक आरोग्यविषयक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. अवकाशामधील गुरुत्वाकर्षणाचा अभाव, हाडांची घनता कमी होणे, स्नायू कमकुवत होणे, तसेच रेडिएशनमुळे दृष्टीवर परिणाम होऊ शकतो. तसेच जास्त काळ अवकाशात राहिल्याने त्यांच्या शरीरावर अनेक बदल देखील दिसून येऊ शकतात. पृथ्वीवर परतल्यानंतर अंतराळवीरांना उभे राहणे आणि चालणे कठीण होऊ शकते. त्यामुळे, सुनीता आणि त्यांच्या टीमला चांगले आरोग्य लाभो ही प्रार्थना करूया.