
डुनेडिन : न्यूझीलंड विरुद्धच्या पाच टी २० सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानचा सलग दुसरा पराभव झाला.
पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला टी २० सामना रविवार १६ मार्च रोजी ख्राईस्टचर्च येथे झाला. या सामन्यात न्यूझीलंडने ९ गडी आणि ५९ चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने सर्वबाद ९१ धावा केल्या तर न्यूझीलंडने १०.१ षटकांत एक बाद ९२ धावा केल्या. यानंतर मंगळवार १८ मार्च रोजी डुनेडिन येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने पाच गडी आणि ११ चेंडू राखून विजय मिळवला. या सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे १५ - १५ षटकांचा सामना खेळवण्याचा निर्णय झाला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने १५ षटकांत ९ बाद १३५ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडने १३.१ षटकांत पाच बाद १३७ धावा केल्या.
लागोपाठ दोन सामन्यात विजय मिळवत मालिकेमध्ये न्यूझीलंडने ०-२ अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा सामना शुक्रवार २१ मार्च रोजी ऑकलंडमध्ये होणार आहे. हा सामना जिंकून विजयाची हॅटट्रिक केल्यास न्यूझीलंड मालिका ०-३ अशी जिंकेल आणि दोन सामने शिल्लक असतानाच पाकिस्तानचे आव्हान संपून जाईल. पण ऑकलंडमध्ये पाकिस्तानचा विजय झाला तर माउंट मौनागानुई येथे बुधवार २३ मार्च रोजी होणार असलेल्या चौथ्या सामन्याचे महत्त्व वाढेल. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचवा आणि मालिकेतील शेवटचा सामना बुधवार २६ मार्च रोजी वेलिंग्टन येथे होणार आहे.