Saturday, October 25, 2025
Happy Diwali

बीसीसीआयच्या नियमावर कपिल देवची ‘बोलंदाजी'

बीसीसीआयच्या नियमावर कपिल देवची ‘बोलंदाजी'
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय क्रिकेट खेळाडूंसदर्भात बीसीसीआयने लागू केलेल्या नव्या नियमातील फॅमिलीसंदर्भातील मुद्दा अजूनही गाजतोय. आयपीएल स्पर्धेला सुरुवात होण्याआधी विराट कोहलीनंही कुटुंबियांसंदर्भातील नियमावर नाराजी व्यक्त केली आहे. बीसीसीआयच्या या चर्चित आणि कठोर नियमाबद्दल भारताचे माजी क्रिकेटर आणि वर्ल्ड चॅम्पियन कर्णधार कपिल देव यांनी आपले मत मांडले आहे. दिग्गज क्रिकेटरने विराट कोहलीच्या सुरात सूर मिसळला असला तरी फॅमिली आणि प्रोफेशन यात योग्य समतोल साधणे गरजेचे आहे, या गोष्टीवरही जोर दिला आहे.
मंगळवारी पत्रकार परिषदेत संवाद साधताना कपिल देव यांनी बीसीसीआयच्या कुटुंबियांला दौऱ्यावर नेण्यासंदर्भातील नियमावर भाष्य केले. ते म्हणाले आहेत की, हा क्रिकेट बोर्डाचा निर्णय आहे. जर मला विचाराल तर हो.. खेळाडूंसाठी फॅमिली सोबत असणे गरजेची आहे. पण त्या खेळाडूनं टीमची साथ देणं हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आमच्या काळात बोर्डाने सांगण्याआधी आम्ही पहिल्या हाफमध्ये खेळावर फोकस करायचो. दुसऱ्या हाफमध्ये कुटुंबियातील मंडळींनी सामन्याचा आनंद घेण्यासाठी बोलवायचो, असा दाखला देत कुटुंबियांना दौऱ्यावर नेत असताना समतोल साधणं गजरेजे आहे, अशा आशयाचे वक्तव्य कपिल देव यांनी केले आहे.
विराट कोहलीने व्यक्त केली होती नाराजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या एका खास कार्यक्रमात विराट कोहलीनं अनेक मुद्यावर भाष्य केले. यावेळी त्याने बीसीसीआयने फॅमिलीसंदर्भात लागू केलेल्या नियमावर नाराजी बोलून दाखवली होती. कुटुंबियांची भूमिका किती महत्त्वपूर्ण असते ते लोकांना पटवून देणं खूप कठिण आहे. त्याचे फायदे लोकांना समजत नाहीत, अशा शब्दांत त्याने बीसीसीआयच्या नियमावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले होते. बीसीसीआयच्या नव्या नियमानुसार, भारतीय संघाचा दौरा जर ४५ दिवसांपेक्षा अधिक काळ असेल तरच खेळाडूंना १४ दिवस फॅमिलीला सोबत नेता येईल. त्यापेक्षा कमी दिवसांच्या दौऱ्यात खेळाडूंना कुटुंबियातील सदस्यांना सोबत नेण्याची परवानगी दिली जाणार नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही खेळाडूंना या नियमाचे पालन करावे लागले होते.
Comments
Add Comment