नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंडियन प्रीमियर लीगच्या १८ व्या हंगामाला येत्या चार दिवसात म्हणजेच २२ मार्चपासून सुरुवात होत आहे. या हंगामापूर्वी मेगा ऑक्शन झाल्याने प्रत्येक संघातच मोठे बदल दिसत आहेत. एका संघाचे मालकच बदलले आहेत. हा संघ म्हणजे २०२२ आयपीएल जिंकलेला गुजरात टायटन्स. अहमदाबादची फ्रँचायझी असलेला हा संघ आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती की अहमदाबादची मालकी असलेल्या आयरेलिया स्पोर्ट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (सीव्हीसी कॅपिटल) कडून टोरंट ग्रुप मालकी हक्क खरेदी करणार आहे. आता या चर्चा खऱ्या ठरल्या आहेत.
अहमदाबादमध्ये मुख्यालय असलेला मोठा बिझनेस समुह टोरंट ग्रुपने गुजरात टायटन्सचे ६७ टक्के हिस्सा खरेदी केले आहेत. या करारासाठी बीसीसीआयकडून मंजूरी देखील मिळाली आहे. त्यामुळे आयपीएल २०२५ मध्ये गुजरातचे नवे सहमालक म्हणून टोरंट ग्रुप दिसणार आहे. टोरेंट ग्रुप, हा आरोग्य सेवा आणि ऊर्जा क्षेत्रात प्रामुख्याने काम करणारा समूह आहे. त्यांच्याकडून गुजरात टायटन्सच्या मालकी हक्कातील मोठा हिस्सा यशस्वीरित्या मिळवल्याची घोषणा करण्यात आली आहे.
नियमांनुसार या मालकी हक्क हस्तांतरणासाठी बीसीसीआयची मंजूरी गरजेची होती, जी आता त्यांना मिळाली आहे. दरम्यान, ६७ टक्के हिस्सा त्यांच्याकडे आहे, पण ३३ टक्के हिस्सा अद्याप सीव्हीसी कॅपिटलकडेच असणार आहे.
बीसीसीआयला मिळणार व्यवहारातील ५ टक्के
रिपोर्ट्सनुसार टोरंट ग्रुपने ६७ टक्के म्हणजे ५०३५ कोटींना हिस्सा खरेदी केला आहे. हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की फ्रँचायझी करारानुसार मालकी समुहांमध्ये झालेल्या प्रत्येक व्यवहाराच्या ५ टक्के हिस्सा बीसीसीआयला मिळण्याचा हक्क आहे. आयपीएल २०२२ च्या आधी सीव्हीसी कॅपिटलने ५६२५ कोटींची बोली लावून अहमदाबाद फ्रँचायझी खरेदी केली होती. त्यांनतर पहिल्याच वर्षी गुजरात टायटन्सने विजेतेपदही जिंकले होते. तसेच २०२३ मध्ये गुजरात उपविजेते ठरले होते. २०२४ मध्ये मात्र त्यांना ८ व्या स्थानी समाधान मानावे लागले होते. लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की टोरेंट ग्रुपने २०२२ आयपीएलपूर्वीही अहमदाबाद फ्रँचायझीसाठी बोली लावली होती. त्यांनी ४६५३ कोटी रुपयांची बोली लावलेली. पण त्यांना संघ विकत घेता आला नव्हता.