खासदार नारायण राणे यांचे जनतेला आवाहन
मालवण : महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस ईश्वराने आणला. भव्य उपस्थितीत आमदार निलेश राणे (Nilesh Rane Birthday) यांचा आजचा वाढदिवस साजरा होत आहे. हा माझ्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. दोन चिरंजीव आमदार त्यातील एक मंत्री, मी खासदार असा आनंदाचा क्षण कोणाचा नसेल. दोन्ही पुत्र कर्तृत्ववान आहेत. मी त्यांचे कर्तृत्व सिद्ध केले म्हणून कौतुक करत आहे. आजचे दिवस तुम्ही दाखवले. तुमचे उपकार आयुष्यात कसे पूर्ण करू हे सांगता येत नाही मात्र हे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही. हे श्रेय आमचे नाही तुम्ही जनता मतदार यांचे श्रेय आहे. सिंधुदुर्गचा विकास अन् येथील जनता सुखी समृद्ध व्हावी हा आमचा ध्यास आहे. योग्य माणसाला निवडून दिले की, विकास आणि विकासच दिसतो. आमचे महायुतीचे सरकार आहे.
आम्हाला सिंधुदुर्ग घडवायचा आहे. तुम्ही नेहमीच आमच्या पाठीशी राहिलात यापुढे निलेश, नितेश (Nitesh Rane) यांना आशीर्वाद द्या असे आवाहन या सोहळ्यात माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी केले. ते मालवण येथील आ. निलेश राणे यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यात बोलत होते. कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मालवण येथे शिवायन महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केक कापून आमदार निलेश राणे यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या सोहळ्यात मंत्री उदय सामंत, मंत्री नितेश राणे (Nitesh Rane), माजी मंत्री दीपक केसरकर, नीलमताई राणे, शिवसेना जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांच्यासह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना खा. नारायण राणे म्हणाले, आ.निलेश राणे आमदार म्हणून कसे विधानसभेत काम करतात ते पाहा. विरोधक दखल घेत आहेत. पालकमंत्री म्हणून नितेश राणे यांच्यासारखे काम करताना एक तरी मंत्री दाखवा. मनाचा मोठेपणा सांगावा लागत नाही. आम्हाला पैसे नकोत प्रेमाचे भुकेले आहोत. मागे वळून पाहू नका मात्र जिल्ह्यातील जनता पाठीशी आहे. १९९० पासून कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत. मी रागावलो तरी ते माझ्या सोबत राहिले. ते माझ्यावर कधी रागावत नाहीत. त्या ९० पासून असलेल्या आणि आता नव्याने जोडलेल्या सर्वच कार्यकर्त्यांनी मला जसे सहकार्य आणि पाठबळ दिलात तशीच साथ माझ्या दोन्ही मुलांना द्या असे आवाहन माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी जनतेला केले.