Tuesday, April 22, 2025
Homeसाप्ताहिककोलाजकामाच्या ठिकाणी महिलांचे शोषण : बदलती प्रवृत्ती आणि स्त्री-अधिकार

कामाच्या ठिकाणी महिलांचे शोषण : बदलती प्रवृत्ती आणि स्त्री-अधिकार

महिला दिन साजरा झाला असला तरी पण कार्यस्थळी महिलांचे वास्तव अजूनही धूसर आहे. स्त्रियांना उच्चपद मिळवण्यासाठी आपल्या नैतिक मूल्यमापनाशी तडजोडी कराव्या लागत आहेत, हे विदारक सत्य आहे. पुरुषप्रधान व्यवस्थेत स्त्रियांना आपल्या आत्मसन्मानासाठी लढावे लागत आहे.

प्रासंगिक – डॉ. वैशाली वाढे

नुकताच जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करण्यात आला. या दिवशी स्त्री-शक्तीचा जयजयकार होतो, पण कार्यस्थळी महिलांचे वास्तव अजूनही धूसर आहे. अनेक क्षेत्रांमध्ये महिलांना संधी दिली जाते, मात्र त्यांच्या कष्टांची किंमत त्यांच्या शारीरिक व भावनिक शोषणाच्या स्वरूपात ठरवली जाते.

कामाच्या ठिकाणी शोषणाची विविध रूपे ही वेगवेगळी आहेत. त्यामुळे या गंभीर समस्येवर महिला धोरणामध्ये उपाय शोधण्याची खूप गरज आहे.

महिला सक्षम होत असताना, काही अधिकारी त्यांचा गैरफायदा घेतात. महिला केवळ त्यांच्या कार्यक्षमतेसाठी नव्हे, तर इतर कारणांसाठी वापरल्या जातात. काही अधिकारी एकाच वेळी अनेक महिलांशी अनैतिक संबंध ठेवतात. महिलांच्या भावनांशी खेळून, त्यांच्या स्वप्नांची दिशा बदलून, त्यांना अशा कचाट्यात अडकवले जाते की, त्या हे सर्व ‘प्रगतीसाठी’ स्वीकारायला तयार होतात.

कामाच्या ठिकाणी स्त्री-पुरुष समानता असली तरी, काही पुरुष अधिकाऱ्यांचे वर्तन अजूनही स्त्रियांकडे केवळ आकर्षणाच्या दृष्टीने पाहणारे आहे. स्त्रियांना बढती, सोयीसुविधा किंवा उच्च पद मिळवण्यासाठी आपल्या नैतिक मूल्यमापनाशी तडजोडी कराव्या लागत आहेत, हे विदारक वास्तव आहे.

सततच्या सुरू असणाऱ्या व स्त्रियांवर बिंबवल्या जाणाऱ्या या पुरुषी वर्चस्वामुळे स्त्रियांची मानसिकता यास बळी पडत आहे आणि त्यामुळे त्यांचा या शोषणाकडे बघण्याचा दृष्टिकोन व प्रवृत्ती बदलत आहे.

पूर्वी महिलांना अशा शोषणाचा सामना करताना मोठी लाज आणि भीती वाटायची. मात्र, आज काही महिला याला “संधी” म्हणून पाहतात. आपली स्वप्ने, करिअर, आर्थिक स्थैर्य यासाठी काहीजणी स्वतःहून अशा सापळ्यात अडकतात. ही मानसिकता समाजासाठी घातक आहे.

स्त्रियांच्या मूलभूत अधिकारांची गळचेपी होत असताना, त्यांचा वापर केवळ एक वस्तू म्हणून केला जातो, हे लक्षात घ्यायला हवे. त्यांच्या नकारामुळे त्यांचे नोकरीतील पुढील भवितव्य धोक्यात आणले जाते. त्यांना त्यांचे पुढील करिअर कुठेच करता येणार नाही यासाठी सर्वतोपरी या न त्या प्रकारे अडचणी आणल्या जातात. अशा स्त्रिया भविष्यात कुठेही नोकरी करू शकणार नाहीत याचा त्या अधिकाऱ्यांकडून पूर्णपणे बंदोबस्त केला जातो. स्त्रीचे स्वतःच्या पायावर उभे राहणे हे इतके कठीण का होत आहे? पुरुषप्रधान व्यवस्थेत स्त्रियांना आपल्या आत्मसन्मानासाठी लढावे लागत आहे. पण सर्वच पुरुष वाईट असतात असे नाही. काही पुरुष सहकारी, अधिकारी आणि व्यवस्थापक खरोखर स्त्रियांना आदराने वागणूक देतात. मात्र, काही पुरुष अधिकाऱ्यांच्या अशा गैरवर्तनामुळे संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.

महिला शोषण रोखण्यासाठी योग्य महिला धोरणांची गरज आहे. त्यासाठी खालील उपाययोजना प्रभावी ठरू शकतात.

  • सशक्त कायदे आणि कठोर अंमलबजावणी – महिला शोषणविरोधी कायद्यांची कडक अंमलबजावणी केली पाहिजे. लैंगिक शोषणविरोधी कायदा (POSH Act) प्रभावीपणे लागू केला जावा.
  • महिला तक्रार निवारण समित्या – प्रत्येक कंपनीत आणि सरकारी कार्यालयांमध्ये तक्रार निवारण समित्या कार्यरत असाव्यात आणि त्यांचा कार्यभाग पारदर्शक असावा.
  • बढतीसाठी निकष पारदर्शक करणे – बढतीसाठी कौशल्य, अनुभव, कार्यक्षमता आणि गुणवत्ता यांनाच महत्त्व द्यावे.
  • महिलांमध्ये जागरूकता आणि शिक्षण – महिलांनी कोणत्याही तडजोडीशिवाय आपल्या कर्तृत्वावर पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
  • पुरुष सहकाऱ्यांसाठी संवेदनशीलता प्रशिक्षण – पुरुष सहकाऱ्यांनी महिलांना आदराने वागवावे यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवले पाहिजेत.
  • कामाच्या ठिकाणी सुरक्षेची खात्री – सीसीटीव्ही, हेल्पलाईन नंबर आणि तक्रार व्यवस्थापन यंत्रणा प्रभावी करावी.

स्त्रिया केवळ शरीराने नव्हे, तर मनाने, बुद्धीने आणि कर्तृत्वाने मोठ्या आहेत. त्यांना पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचा अधिकार आहे. कार्यालये, कंपन्या, उद्योग क्षेत्र आणि सरकारी यंत्रणा यांनी याची जाणीव ठेवून स्त्रियांना योग्य तो सन्मान दिला पाहिजे. लालसेपोटी वाहत जाणाऱ्या आणि नैतिकतेशी तडजोड करणाऱ्या स्त्रियांचे समुपदेशन करून त्यांना योग्य समज द्यावा.

स्त्रियांना हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे, हीच मोठी शोकांतिका आहे; परंतु या परिस्थितीत बदल घडवण्यासाठी, महिलांनी स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवून कोणत्याही परिस्थितीत आपल्या आत्मसन्मानाशी तडजोड न करता प्रगती साधली पाहिजे.

महिलांवरील अन्याय, शोषण आणि तडजोडींच्या मानसिकतेला कायमचे संपवण्याचा निर्धार सर्वांनी करू या!…
के. जे. सोमैया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सायन, मुंबई

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -