Tuesday, April 22, 2025
Homeसाप्ताहिककिलबिलचौलचे दत्त मंदिर

चौलचे दत्त मंदिर

कोकणी बाणा – सतीश पाटणकर

ऐतिहासिक शहर चंपावतीनगर म्हणजेच आजचे चेऊल अथवा चौल होय. रेवदंड्यापासून जेमतेम ४-५ कि.मी.वर वसलेले शांत सुंदर चौल. आजूबाजूला भातशेती, कोकणी कौलारू घरे आणि फणसाच्या झाडांची सोबत लाभलेलं टुमदार चौल. पावसाळ्यात पाणी घरात येऊ नये म्हणून इथली घरे एका चौथऱ्यावर बांधलेली आढळतात. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, थळ, साखर, अक्षी इत्यादी आठ आगरांच्या मिळून बनलेल्या समूहाला अष्टागर हे नाव पडले आहे. चौल हे या अष्टागरांचे राजधानीचे ठिकाण होते. चौलपासून जवळच असलेल्या एका टेकडीवर हे दत्तस्थान आहे. ही टेकडी दत्ताची टेकडी या नावाने ओळखली जाते. टेकडीच्या पायथ्याशी भोपाळे तळे या नावाचे एक तळे लागते.

स्वयंसिद्ध महिलांचा रंगमंचीय ‘शिवप्रताप’…

पुणे-मुंबई रस्त्यावर अलिबागपासून १६ किमी अंतरावर चौल नाक्यापासून २ किमी अंतरावर डोंगरवजा टेकडीवर अत्यंत नयनरम्य टेकडीवर हे दत्त मंदिर आहे. समृद्ध वनराई उत्तम बांधलेल्या पायऱ्या यामुळे हे स्थान अतिशय प्रेक्षणीयही वाटते. सुमारे ५०० पायऱ्या चढून गेल्यानंतर डाव्याच बाजूला श्री स्वामी समर्थांचा मठ आहे. त्यानंतर आणखीन ३० पायऱ्या चढून गेल्यावर श्रीदत्तमंदिर विश्रांती स्थान आहे. येथेच श्री सद्गुरू बुरांडे महाराजांचे समाधीस्थान आहे. पुढे सुमारे १५० पायऱ्या चढून गेल्यानंतर सत्चित आनंद साधना कुटी आहे. त्यानंतर काही अंतर चालून गेल्यानंतर हरे राम विश्राम धाम व त्यानंतर हरे राम बाबाचे धुनीमंदीर व पुढे औदुंबर मठ आहे. त्यानंतर लगेचच अत्याधुनिक अशा दत्तमंदिराचे बाह्य दर्शनच मोहरून टाकते. येथे सर्वांग सुंदर काळ्या पाषाणाची मूर्ती षड्भुज असून पाहताच मन हरवून जाते. प्रदक्षिणेसाठी बाजूने जागा असून मंदिराचा गाभारा थोडा उंचावर आहे. मंदिराच्या दक्षिणेला माई जानकीबाई व हनुमानदास बाबा यांचा मठ आहे.

देवालयाच्या कमानीपासून गाभाऱ्यापर्यंत छोटासा जिना आहे. प्रतिवर्षी दत्तजयंतीपासून ५ दिवस येथे दत्तजयंतीचा मोठा उत्सव होतो. या काळात येथे हजारो लोक येऊन दर्शनाचा लाभ घेतात व सुखी संसारासाठी श्री गुरुंना प्रार्थना करतात. हे मंदिर दत्तात्रेयांचे अत्यंत जागृत स्थान असून अनेक भक्त येथील दर्शनाने मनोकामना पूर्ण झाल्याचे सांगतात. श्री दत्त मंदिरापासून खाली पाहिले असता अत्यंत नयनमनोहर व विहंगम दृष्य दिसते. सदर मंदिर शिवरायांच्या काळात बांधल्याचे सांगतात. या अत्युच्च शिखरावरून सभोवतालच्या परिसरावर देखरेख ठेवण्यासाठी बांधल्याचे सांगतात त्यावरील लाल कळस असलेले मंदिर स्वामी ब्रह्मेंद्र यांनी बांधल्याचे सांगतात. या मंदिर परिसरात स्वयंभू शिवलिंगही आहे. वरती गेल्यावर समोर एक मठ लागतो. तिथे दोन औदुंबर वृक्ष आहेत. त्या वृक्षांखालीच पहिल्यांदा दत्तपादुका होत्या. इथेच वरच्या बाजूला एका मंदिरात दत्तमूर्ती व त्या मूर्तीच्या पुढ्यात मूळ पादुका आहेत. इथे हरेरामबुवा, मुरेडेबुवा, बजरंगदासबुवा, दीपवदासबुवा अशा सत्पुरुषांचे वास्तव्य होते. पैकी मुरेडेबुवांची इथे समाधी आहे. सन १९६३ साली या स्थानाचा जीर्णोद्धार करण्यात आला. इथे मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला खूप मोठी यात्रा भरते. ही जत्रा ५ दिवस चालते. हे स्थान मुंबईपासून १०९ किमी अंतरावर आहे. दत्तभक्तांनी या मंदिरात अवश्य दर्शन करावे.

(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -