Friday, March 28, 2025
Homeसाप्ताहिकरिलॅक्सस्वयंसिद्ध महिलांचा रंगमंचीय ‘शिवप्रताप’...

स्वयंसिद्ध महिलांचा रंगमंचीय ‘शिवप्रताप’…

राज चिंचणकर

छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र रंगमंचावर साकारायचे म्हणजे सोपी गोष्ट नाही. त्यासाठी इच्छाशक्ती आणि मेहनत घेण्याची तयारी तर हवीच; परंतु त्याचबरोबर रंगमंचावर प्रयोग सादर करण्यासाठी लागणारे सातत्य, चिकाटी या सर्व गोष्टीही सोबत असाव्या लागतात. सध्या रंगभूमीवर सुरू असलेल्या ‘शिवप्रताप’ या नाटकाची टीम मात्र या सगळ्या बाबी अंगी बाणवत हा प्रयोग रंगमंचावर सादर करत आहे. या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे या नाटकात सर्व भूमिका महिलावर्गच साकारत आहे. केवळ दोन-चार नव्हेत; तर तब्बल ४५ महिलांचा ताफा या नाटकात विविध व्यक्तिरेखा रंगवत असून, त्यांची ही कामगिरी नाट्यसृष्टीने दखल घेण्याजोगी आहे. एकाअर्थी हे नाटक हौशी महिलांनी महिलांसाठी केलेले असले, तरी असे शिवधनुष्य उचलण्यासाठी निर्मितीची बाजूही चोख असायला हवी. या संदर्भाने, या नाटकाच्या निर्मितीमागची कहाणी अधिकच रोचक आहे. मुंबईच्या परळ भागात महिलांसाठी कार्यरत असलेल्या ‘स्वयंसिद्धा’ या संस्थेने, महिलांमध्ये दडलेल्या कलागुणांना वाव मिळवून देण्याच्या हेतूने, ‘शिवजयंती’चे औचित्य साधून दोन वर्षांपूर्वी या नाटकाचा शुभारंभ केला. परळच्या दामोदर हॉलमध्ये या नाटकाचा प्रयोग होता. त्या दरम्यान, एक व्यक्ती त्या नाटकासाठी लाठीकाठीचे प्रशिक्षण देण्यासाठी आणि बॅकस्टेजला काही जबाबदारी उचलण्यासाठी तिथे आली. नाटक पाहिल्यावर त्या महिलांची जिद्द व चिकाटी पाहून ती व्यक्ती पार भारावून गेली आणि त्या महिलांमध्ये असलेल्या कलेला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे त्या व्यक्तीने त्याक्षणीच नक्की केले. त्या व्यक्तीचे नाव प्रवीण राणे…! रंगमंचावर तब्बल ४५ महिलांकडून सादर केल्या जात असलेल्या या नाटकाच्या मागे ते ठामपणे उभे आहेत.

गिरणगावात आयुष्याची जडणघडण झालेले प्रवीण राणे हे एक उत्तम कबड्डीपटू व समाजसेवक तर आहेतच; पण त्याचबरोबर मराठीजनांनी उद्योगात उतरले पाहिजे आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करून त्यांनी नाव कमावले पाहिजे, असा ध्यास त्यांनी मनाशी बाळगला होता. त्या अानुषंगाने, हॉटेल उद्योगात उतरून एक मराठी मुलगा उत्तम व्यवसाय करू शकतो, याचे उदाहरण त्यांनी समाजासमोर ठेवून आज युवा उद्योजक म्हणून प्रतिष्ठा मिळवली आहे. हेच प्रवीण राणे ‘शिवप्रताप’ नाटक पाहून पार भारावून गेले आणि या टीमच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा त्यांनी निश्चय केला. नाटकातल्या सर्व कलाकारांशी त्यांनी त्याप्रमाणे चर्चा केली आणि मग पुढे नाटकाचा प्रवास बघता बघता आता महाराष्ट्रभर सुरू आहे. अलीकडेच, म्हणजे यंदाच्या २५ जानेवारी रोजी ‘विनया एंटरटेनमेंट’च्या या नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोगही उत्साहात पार पडला. आज रंगभूमीवर तब्बल ४५ महिलांनी साकारलेले ‘शिवप्रताप’ हे नाटक नावारूपाला आले आहे. ते केवळ प्रवीण राणे यांच्यामुळे, अशी भावना या नाटकाच्या संपूर्ण टीमकडून व्यक्त केली जात आहे.

‘शिवप्रताप’ या नाटकाची निर्मिती आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण राणे यांनी उचलली आहे. त्याबाबत बोलताना ते म्हणतात, “शिवरायांची शिकवण लक्षात ठेवून, महिलांचा आदर करणे महत्त्वाचे आहे. तसेच माझ्या आईने माझ्यावर केलेले संस्कार माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. प्रत्येक स्त्रीमध्ये काही कलागुण असतात आणि त्यांना योग्य संधी देण्याची आवश्यकता असते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा हा चालता-बोलता नाट्याविष्कार जोपर्यंत जगभरात पोहोचवत नाही आणि या गृहिणींमध्ये दडलेल्या कलाकारांना जोपर्यंत स्वतःचे नाव मिळवून देत नाही; तोपर्यंत मी हाती घेतलेले हे कार्य पूर्णत्वास जाणार नाही. त्यासाठी सर्वतोपरी मेहनत करण्याची माझी तयारी आहे. या नाटकाचे पाच हजार प्रयोग भारतभर होईपर्यंत हा प्रवास थांबणार नाही”. नाटकाच्या या सगळ्या प्रवासाविषयी या नाटकातल्या महिला कलाकारांशी संवाद साधला असता त्या म्हणतात, “या नाटकात काम करण्यासाठी आमच्या कुटुंबांचा पाठिंबा तर आम्हाला आहेच आणि म्हणूनच आम्ही आज रंगमंचावर दोन वर्षे हे नाटक करत आहोत. तसेच आमचे निर्माते, दिग्दर्शक प्रवीण राणे यांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहोत”.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -