परवा सहज सुचलं की टीव्ही सिरीयलवाले कसं एखादा सण आला की आपल्या कथानकात आवश्यकता असो वा नसो, तो घुसडतातच..! त्याने म्हणे टी.आर.पी. की काय तो वाढतो. गणेश चतुर्थीला निदान दीड ते पाच दिवसांचा गणपती, रक्षाबंधन, दिवाळी अगदी १५ ऑगस्ट, २६ जानेवारी जसे सिरीयल्सच्या कथानकात डोकावतात, तसे हेच सण आपल्या लेखांच्या सिरीजमधे डोकावले तर? म्हणून मग होळीचा सण अनायसे समोर उभा ठाकला असता, मराठी नाटक आणि होळी किंवा रंगपंचमी एकमेकाला पूरक आहेत का? याचा आढाव घेऊ या उद्देशाने हे लिखाण करतोय…!
डोक्यात विषय आला खरा पण पट्कन असे नाटक काही आठवेना. ज्यात होळीचा संदर्भ आला आहे. नाही म्हणायला महेश एलकुंचवारांचे “होळी” नामक प्रायोगिक नाटक रंगभूमीवर १९६९ साली रंगायन या संस्थेद्वारा येऊन गेले. परंतु त्या नाटकात होळी या सणाच्या अानुषंगाने संदर्भ नव्हता. वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा प्रक्षोभ इथवरच “होळी”चा संदर्भ त्यातून अधोरेखित केला गेला होता. होळी किंबहूना रंगपंचमी ज्या प्रमाणात हिंदी सिनेमातून गाजली तशी ती मराठी नाटकातून कधीच पहायला मिळाली नाही. उलटपक्षी होळी आणि दहीहंडी सिनेमात आली की सिनेमा सुपरहिट होतो, असे समीकरण आजही लोकमान्य आहे. मराठी नाटकांना या सणाबाबत नाराजीच आहे, याचे कारण लेखकच सांगू शकतील. कोकणात नाही म्हणायला आठ आठ दिवस होळी साजरी केली जात असूनही, कोकणातल्या नाटककारांच्या नाटकात रंगपंचमी दिसलेली नाही. मधु मंगेश कर्णिक, जयवंत दळवी, बाळ कोल्हटकर, मामा वरेरकर, पु. ल. देशपांडे आदींनी अनेक नाटके लिहून गाजवली, परंतु त्यात रंगपंचमी काही दिसली नाही.
मात्र ६०-७० च्या दशकांत काही अपवाद मात्र प्रकर्षाने जाणवतात. संगीत नाटकांचा विचार करता सं. मंदारमाला आणि सं. बावनखणी या नाटकातून अण्णा (विद्याधर) गोखल्यानी रंगपंमीच्या प्रसंगांचे संदर्भ दिले आहेत. नाटकाच्या अखेरीस तर क्लायमॅक्स हा होलिकोत्सवावरच बेतलेला आहे, यासाठी गायन, वादन (तबला व पखावज), नृत्य यांचा अनोखा संगम पहावयास मिळतो. भाव तोचि देव या नाटकात नानासाहेब शिरगोपीकरांनी एकनाथ महाराजांचा शिष्य श्रीखंड्याच्या रुपात श्रीकृष्णाचा रचलेला ट्रीकसीन तर बघण्यासारखा होता. त्यातील होलिकोत्सवात ९ रसांच्या ९ रंगाच्या साड्यांतील बदल बघण्यासाठी प्रेक्षक नाटकाला गर्दी करत. परंतु आता ती संगीत नाटके, ते ट्रीक सीन्स, सारेच ओढगस्तीला लागले आणि रंगपंचमी नाटकांतून हद्दपार झालीय.
माझ्याकडून एखादा संदर्भ राहून जाऊ नये म्हणून मी सर्वात पहिला फोन, प्रसिद्ध रंगभूषाकार शरद सावंत यांना केला. त्यांनाही गेल्या ३५ वर्षांत एकाही पात्रास रंगपंचमीचा मेकअप केल्याचे आठवेना…! मग संजय मोने, शेखर ताम्हाणे, राजीव जोशी, प्रमोद पवार, रामनाथ थरवळ यांच्याशी बोलूनही कुणाला धुळवडीचे मराठी नाटक लक्षात येत नव्हते. मोनेंशी बोलताना, निर्मात्याला एकंदर प्रसंग संपल्यावर साफसफाईचा खर्च नको म्हणून लेखकच आपल्या कल्पना शक्तीवर अंकुश ठेवत असतं व कदाचित रंगपंचमीचा सीन लिहीत नसावेत, अशा निष्कर्षाप्रत येऊन ठेपलो. उपरोक्त लेखातील दोन-तीन संगीत नाटकांचे संदर्भ मुकुंद मराठे यानी दिले म्हणून निदान मराठी नाटकांना रंगपंमीचे वावडे नाही, असे म्हणण्यास निदान वाव तरी राहातो.नाही म्हणायला मराठी नाटकात गणेशोत्सव, आषाढी एकादशी, नाटकातील पात्रांचेच हॅपी बर्थडे असे अनेक उत्सव कथानकाच्या अानुषंगाने आलेले आपण पहात आहोत. चं.प्र.नी तर “ढोल-ताशे” लिहून उत्सवीकरणावर परखड भाष्य केले होते. मध्यंतरी तर पंढरपूरवारी फारच ट्रेंडिंग होती. कमरेवर हात ठेऊन, फूट लाईट मारला की प्रेक्षकातील भाविक टाळ्या पिटत.
रंगपंचमीचे मार्केटिंग रोमँटिक या सदरात होऊनही मराठी लेखकांनी त्या सणाकडे पाठ फिरवलेली आढळते. अगदी हौशी एकांकिकांतून व्यावसायिकतेकडे कूच करणाऱ्या नवलेखकांनीही या सणाकडे पाठ फिरवलीय. शोध घेत असता गेला बाजार, बाळ कोल्हटकरांच्या नाटकात एखादी बहीण सदृश पात्र पदराखाली झाकून पुरळपोळ्या दुर्दैवाच्या दशावतार भोगत असलेल्या स्त्रीपात्रास “आज होळीनिमित्त केल्या होत्या, खाऊन घे…!” असं म्हणतानाही आढळत नाही. सांगायचा मुद्दा एवढाच की या सणाच्या जडण घडणीतच ड्रामा असल्याने तो मराठी नाटकांत यायला हवा..!
१९७२ साली प्रथम हौशी आणि नंतर व्यावसायिक रंगभूमीवर गाजलेल्या “घाशिराम कोतवाल” या नाटकात मात्र होळीचा प्रसंग आणि त्याच्या अानुषंगाने येणारी “सख्या चला बागामदी, रंग खेळू चला” ही भास्कर चंदावरकरांनी रचलेली सुपरहिट लावणी शृंगारिक रंगपंचमीने धमाल उडवून दिली. विश्वास पाटलांच्या रणांगणमध्येही प्रा. वामन केंद्रे यांनी, पेशवे एका युद्धातील विजय धुळवडीने साजरा करतानाचा प्रसंग विसरता येत नाही. हल्लीच हौशी रंगमंच गाजवलेल्या इरफान मुजावरच्या वृंदावन नाटकात विधवांच्या आयुष्यात येणारी होळी नशिबी आलेल्या पांढऱ्या रंगापेक्षा क्रांतिकारी असू शकते अशा आशयाच्या प्रसंगाने अंगावर काटा येत असे. पण असे मोजक्याच प्रसंगाची नाटके सोडल्यास मराठी नाटकांना रंगपंचमी तशी रुचलेली नाही असेच म्हणावे लागेल. मधेच असेही वाटून गेले की कल्पना एक आविष्कार अनेक वाल्यानी रंगपंमी या सणाचे सार्वत्रिकरण होण्यासाठी निदान या विषयाशी निगडित असलेली वन लाईन द्यावी, म्हणजे पोटभर रंगपंमीची नाटके बघता येतील. असो, तर… या लेखातून वाचकांना फारसे काही हाती लागो वा न लागो, येणाऱ्या नव्या लेखक जनरेशनने “होळी” मनावर घ्यावी…!
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ३४व्या सामन्यात आज पंजाब किंग्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला हरवले…
नवी दिल्ली : आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा ठरला आहे. भारताच्या सांस्कृतिक वारशाला…
घाटकोपर मध्ये हिंदी माध्यमातील पाठ्यपुस्तके जाळून मनसेने केला निषेध मुंबई : हिंदी भाषा सक्ती विरोधात…
या प्रकरणात माजी आमदार वैभव नाईक यांचीही चौकशी करा कुडाळ : वैभव नाईक जेव्हा आमदार…
नवी मुंबई : प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांव्दारे एकल वापरातील प्लास्टिकचा वापर थांबविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास…
मुंबई : राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात…