नाशिक (प्रतिनिधी) : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी व यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थांमध्ये प्रवेशासाठी जेईई मेन्स परीक्षेच्या एप्रिलमधील दुसऱ्या सत्राचे आयोजन २ ते ९ एप्रिलदरम्यान केले जाणार आहे. या संदर्भात नॅशनल टेस्टिंग एजन्सीने तारखांची घोषणा केली आहे. यापूर्वी जानेवारी सत्रात जेईई मेन्स परीक्षा घेतली होती.
या परीक्षेचा निकाल फेब्रुवारीत जाहीर करण्यात आला होता. नियोजित वेळापत्रकाप्रमाणे विद्यार्थ्यांना जेईई मेन्स परीक्षा देण्याच्या दोन संधी उपलब्ध करून दिल्या जातात. यांपैकी चांगली कामगिरी असलेल्या परीक्षेतील गुण ग्राह्य धरून त्याआधारे राष्ट्रीय क्रमवारी जाहीर केली जाते. जानेवारी सत्राची परीक्षा झालेली असून, आता बारावीची लेखी परीक्षा संपल्यानंतर एप्रिलमध्ये परीक्षेची दुसरी संधी उपलब्ध केली जाणार आहे.
मतदार ओळखपत्र – आधार कार्ड लिंक करण्याच्या संदर्भात मंगळवारी महत्त्वाची बैठक
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार २, ३, ४ आणि ७, ८ एप्रिलला बीई/बीटेकसाठीचा पेपर क्रमांक एक होणार आहे. या दिवशी सकाळी नऊ ते दुपारी बारा आणि दुपार सत्रामध्ये दुपारी तीन ते सायंकाळी सहा या सत्रनिहाय परीक्षा घेतल्या जातील. ही परीक्षा संगणकावर आधारित (कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट) असेल. आर्किटेक्चर व डिझाइन क्षेत्रातील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पेपर क्रमांक २ चे आयोजन ९ एप्रिलला केले जाणार आहे. देशभरातील विविध शहरांवरील परीक्षा केंद्रावर तसेच देशाबाहेर १५ शहरांतील केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे.
Thumka Lagao Or Get Suspended : ‘नाच नाही निलंबन करतो’, बेधुंद नेत्याने पोलिसाला सुनावले
आता प्रवेशपत्राची प्रतीक्षा
परीक्षांच्या तारखा जाहीर झालेल्या असून, आता विद्यार्थ्यांना प्रवेशपत्राची प्रतीक्षा लागून राहणार आहे. प्रवेशपत्रावर परीक्षेची तारीख, सत्राची वेळ व परीक्षा केंद्राचा तपशील उपलब्ध असल्याने परीक्षा वेळेसंदर्भात स्पष्टता येऊ शकणार आहे. साधारणतः मार्चच्या शेवटच्या आठवड्यात प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची शक्यता आहे.