पोलादपूर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पोलादपूर आणि खेडदरम्यानच्या कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गापैकी दुसरा भुयारी मार्ग शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीस खुला झाल्यानंतर आता मुंबईकडे जाणाऱ्या भुयाराला तिरंगा आणि कोकणाकडे जाणाऱ्या भुयाराला वारली चित्रकलेने सजविण्यात आले आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भुयारभेटीदरम्यान महावितरणसोबत संपर्कात राहण्याचे निर्देश भुयाराच्या कामाच्या ठेकेदार कंपनी एसडीपीएलला दिले होते. मात्र, आजतागायत महावितरणकडून विद्युतप्रवाह सुरू न झाल्याने विद्युत प्रकाशझोत आणि व्हेंटिलेशनचे पंखे बंदच आहेत.
Naresh Mhasake : ‘ब्रिटिश, मुघल प्रतिकांपासून देशाला मुक्त करावे’
मुंबई-गोवा महामार्गावरील धोकादायक कशेडीतील दोन्ही भुयारी मार्ग सोमवारी सायंकाळपासून वाहतुकीसाठी खुले झाल्याने चाकरमान्यांना शिमगोत्सवात नवीन भुयारी मार्गातून एकेरी वाहतुकीसाठी सुसाट प्रवास करता येणार आहे. दोन्ही भुयारी मार्गात कायमस्वरुपी वीजपुरवठयासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याने महावितरणकडे ११ के.व्ही. क्षमतेच्या विजेची मागणी केली असता त्यापोटी ८० लाख रुपयांचे डिपॉझिट भरणा करण्याबाबत कोटेशन दिले होते. अनामत रक्कम भरण्याची प्रक्रिया लांबणीवर पडल्याने शिमगोत्सवात दोन्ही भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुले होण्याबाबत साशंकता व्यक्त होत असताना राष्ट्रीय महामार्ग विभागाने दोन्ही भुयारी मार्गात जनरेटरची सुविधा उपलब्ध करून दिली. विद्युतपुरवठा खंडित झाल्यास वाहतूक व्यवस्थेत कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये, याकरिता तात्पुरत्या स्वरूपात जनरेटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून कायमस्वरुपी वीज पुरवठयासाठी अनामत रक्कम भरण्याची प्रक्रिया देखील अंतिम टप्यात असल्याचे एसडीपीएल कंपनीकडून सांगण्यात आले. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून पळस्पे ते कशेडी घाटातील भुयारी मार्गापर्यंतचा दौरा केल्यानंतर भुयारी मार्गातील विद्युत प्रकाशघोत आणि वायू विजनासाठी विद्युतप्रवाह सुरू करण्यासाठी महावितरणच्या संपर्कात ठेकेदार कंपनीने राहण्याचे सुचविले होते. मात्र, भुयारी मार्गातील विद्युतप्रवाह सुरू न झाल्याने जनरेटरचा वापर काही दिवस करण्याची व्यवस्था करून तातडीने शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या भुयारातून कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी प्रवास वेगवान करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे.
पोलादपूर ते खेड दीड तासाचे अंतर पार करण्यासाठी यापूर्वी कशेडी घाटातील वळणा वळणाच्या घाट मार्गामुळे ४५ मिनिटांचा कालावधी लागत असे. मात्र, भुयारी मार्गामुळे फक्त १० मिनिटात पार करता येत असल्याने अनेक एसटी बसेस, खासगी ट्रॅव्हल्सच्या कार, ट्रक, कंटेनर, ट्रॅव्हल्सच्या बसेस, लहान वाहने भुयारी मार्गाने जात आहेत. कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहनांतून भुयारीमार्गे प्रवासादरम्यान विस्मयचकित होऊन आनंदाने चित्कार आणि आरडाओरड करून व्यक्त होण्याचा प्रकार सुरू
झाला आहे.