ठाणे : भारतीय संस्कृतीशी काही देणेघेणे नसलेल्या, पारतंत्र्य आणि क्रूरतेची निशाणी असलेल्या मुघल आणि ब्रिटिशांच्या वारशांचे आपण गेली ७५ वर्ष `ऐतिहासिक’ या गोंडस नावाखाली जतन करत आलो आहोत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या संरक्षणाखाली ३,६९१ स्मारके आहेत. परंतु यापैकी २५ टक्के स्मारकांना कोणतेही राष्ट्रीय किंवा सांस्कृतिक महत्त्व नसल्याची धक्कादायक माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. भारतीय वारशांचे अधिक प्रमाणात जतन करण्यासाठी ब्रिटिश आणि मुघल प्रतिकांपासून देशाला मुक्त करावे तसेच क्रूरकर्मा औरंगजेब याची कबर नष्ट करण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत लावून धरली.
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही आपण ऐतिहासिक वारशांचे रक्षण करण्याच्या नावाखाली वसाहतवादी भूतकाळाचे ओझे वाहून नेत आहोत. या संरक्षित स्मारकांमध्ये ब्रिटीश सैनिक आणि अधिकाऱ्यांच्या ७५ कबरी आहे. ज्यांचा भारताच्या सभ्यता आणि संस्कृतीशी काहीही संबंध नाही. भारताला गुलाम बनविणाऱ्यांच्या आठवणी आपण आपला वारसा म्हणून जपतो आहोत हे योग्य आहे का? असा सवाल करत आपल्या स्वाभिमानाचा आणि स्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानाचा आपण अवमान करत असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले. औरंगजेब रोड, बाबर रोड सारखी नावे आपल्याला भारताच्या गुलामगिरीची आठवण करून देतात, ती त्वरित बदलून भारताच्या वीरांच्या नावावर ठेवली पाहिजेत, तसेच मुलांना महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई, गुरु गोविंद सिंग यांच्या शौर्याच्या गाथा सांगितल्या पाहिजेत. त्यासाठी ठोस पावले उचलण्याची विनंती खा. नरेश म्हस्के यांनी संसदेत केली.