Friday, April 18, 2025
Homeताज्या घडामोडीतुम्ही Proprty Tax भरत असाल तर हे तुमच्यासाठी महत्त्वाचे!

तुम्ही Proprty Tax भरत असाल तर हे तुमच्यासाठी महत्त्वाचे!

मालमत्ता कर थकबाकीवर मिळणार ५० टक्के विलंब शास्ती माफीची संधी

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेतील मालमत्ताकर थकबाकीदारांना एक उत्तम संधी महानगरपालिकेने उपलब्ध करून दिली आहे. महानगरपालिकेने मालमत्ताकर विलंब शास्तीमध्ये ५० टक्के सूट देणारी अभय योजना 31 मार्च रोजी रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर केली आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांनी याबाबत निर्णय घेतला असून मालमत्ता कर थकबाकीदारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि विलंब शुल्क वजा करून आपली देयके भरावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, अभय योजनेंतर्गत मूळ मालमत्ताकराच्या थकीत रकमेत कोणतीही सवलत नसून मूळ मालमत्ता कर तसेच सवलतीनंतरच्या शास्तीसह येणारी संपूर्ण देय रक्कम भरणा करणे आवश्यक आहे. अंशतः भरलेल्या रक्कमेस या योजनेचा लाभ मिळणार नाही.

महापालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ताधारकांनी दिलेल्या वेळेत कर भरणा करण्यासाठी वेळोवेळी आवाहन करण्यात येत आहे. तरीही काही मालमत्ताधारक अद्यापही कराचा भरणा करणेस टाळाटाळ करीत आहेत. याबाबत थकबाकी असलेल्या नागरिकांवर विशेष लक्ष केंद्रीत करुन कायदेशीर अटकावणीची कार्यवाही करण्यात येत आहे.

महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता धारकांकडे मोठ्या प्रमाणात मालमत्ताकर थकीत आहे. मालमत्ताकर चांगल्या पद्धतीने वसुली होण्यासाठी महापालिका आयुक्त यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार विलंब शास्तीमध्ये माफीचे अधिकार प्राप्त आहेत. त्यानुसार आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आदेश पारित करून मालमत्ता कर विलंब शास्तीत सूट देणारी अभय योजना जाहीर केली आहे. यामध्ये 31 मार्च रोजी पर्यंत चालू वर्षापर्यंतचा मालमत्ता कर एकरकमी भरल्यास मालमत्ता कर विलंब शास्तीमध्ये ५० टक्के सूट देणारी अभय योजना जाहीर केली आहे.

असा घ्या योजनेचा लाभ

अभय योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. सदर ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा nmmc.gov.in या संकेत स्थळावर तसेच ‘My NMMC – माझी नवी मुंबई’ या मोबाईल अॅपवर त्याचप्रमाणे महानगरपालिका मुख्यालय, सर्व विभाग कार्यालये व सर्व देयक भरणा केंद्रांवर उपलब्ध आहे. मालमत्ता कराचा भरणा हा महापालिका मुख्यालय, सर्व विभागीय कार्यालये व सर्व भरणा केंद्रावर रोख / धनादेश / धनाकर्ष याव्दारे भरता येईल. धनादेश हे अभय योजनेच्या कालावधीमध्ये कोणत्याही कारणास्तव न वठल्यास अर्जदारास अभय योजनेचा लाभ अनुज्ञेय होणार नाही. तसेच कराचा भरणा महानगरपालिकेच्या nmmc.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन पध्दतीने Debit card / Credit card / Internet Banking / NEFT / RTGS / UPI तसेच My NMMC – माझी नवी मुंबई या मोबाईल अॅपद्वारे करता येईल. रोखीने भरणा करावयाचा असल्यास भारतीय रिझर्व्ह बँकेचे या संदर्भातील नियम लागू होतील, याची नोंद घेण्यात येईल.

मालमत्ता कर एकरकमी भरणाऱ्यांना मिळणार लाभ

अभय योजना लागू होण्यापूर्वी भरणा केलेला मालमत्ताकर तसेच शास्ती / व्याजाच्या रक्कमेच्या संदर्भात कोणतीही सूट मिळणार नाही, तसेच त्यांचा परतावा देखील मिळणार नाही. अभय योजना ही केवळ 31 मार्च रोजी रात्री 12 वाजेपर्यंत विहीत मुदतीत चालू वर्षापर्यंतचा मालमत्ताकर एकरकमी भरणा करणाऱ्या मालमत्ता धारकांनाच लागू असणार आहे. यामुळे नागरिकांनी मुदतीत चालू वर्षापर्यंतचा मालमत्ताकर एकरकमी भरणा करून अभय योजनेचा लाभ घ्यावा तसेच करवसुलीसाठी येणाऱ्या वसुली पथकांना सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -