मुंबई : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मटण, चिकन आणि दारू खरेदीसाठी दुकानांबाहेर तुफान गर्दी झाली आहे. मुंबईत मटण ८४० तर नागपूरमध्ये ८८० रु किलो दराने विकले जात आहे. कितीही दर असला तरी विकत घ्यायचेच असे ठरवून अनेकांनी दुकानांच्या बाहेर गर्दी केली आहे. दोन – तीन तास उभे राहावे लागले तरी जिभेचे चोचले पुरवण्यासाठी खरेदी करायचीच असे ठरवून खवय्यांनी मटण, चिकन आणि दारू खरेदीसाठी दुकानांबाहेर लांबच लांब रांगा लावल्या आहेत.
होळी आणि धूलिवंदनाच्या दिवशी मुंबईसह महाराष्ट्रात मटण, चिकन आणि दारू खरेदीसाठी गर्दी होते. यामुळे यंदा मागील काही दिवसांत मटण, चिकन आणि दारूच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. या वाढलेल्या दरांची चिंता न करता खवय्यांनी जिभेचे चोचले पुरवण्याला प्राधान्य दिले आहे. दुसरीकडे राज्यात ठिकठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. कायदा – सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. महत्त्वाच्या रस्त्यांवर निवडक ठिकाणी नाकाबंदी करुन पोलीस वाहन चालकांची तपासणी करत आहेत. दारू पिऊन वाहन चालवू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. कायद्यांचे पालन करा, असेही आवाहन पोलिसांनी केले आहे.
राजकारणी, क्रीडापटू, मनोरंजनसृष्टीशी संबंधित सदस्यांनीही रंग खेळून सण उत्साहात साजरा केला. राजकारण, क्रीडा आणि मनोरंजनसृष्टीतील सेलिब्रेटींनी नागरिकांना धूलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.