कॅनाव्हेरल (अमेरिका) : भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि अंतराळवीर बुच विल्मोर या दोघांचा अंतराळातील मुक्काम वाढला आहे. दोघे मागील नऊ महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आहेत. नासा आणि स्पेसएक्सने क्रू-१० चे प्रक्षेपण तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलले आहे. प्रक्षेपणाची नवी तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. क्रू-१० चे प्रक्षेपण लांबणीवर पडल्यामुळे अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि अंतराळवीर बुच विल्मोर या दोघांना आणखी काही काळ आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहावे लागणार आहे.
चार ताज्या दमाचे अंतराळवीर नासा आणि स्पेसएक्सने संयुक्तपणे तयार केलेल्या क्रू-१० यानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणार होते. ते अंतराळवीर उतरल्यानंतर सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर क्रू-१० यानातून पृथ्वीवर परतणार होते. पण क्रू-१० चे प्रक्षेपण लांबणीवर पडले. यामुळे सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोरचा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील मुक्काम वाढला आहे. जोपर्यंत नव्या अंतराळवीरांना घेऊन यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणार नाही तोपर्यंत सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर परतू शकणार नाहीत.
पानिपत येथे ‘मराठा शौर्य स्मारक’ होणार – मंत्री जयकुमार रावल
अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि अंतराळवीर बुच विल्मोर हे दोघे फक्त आठ दिवसांच्या अंतराळ मोहिमेसाठी म्हणून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेले होते. पण तांत्रिक कारणामुळे परतीसाठी यान उपलब्ध झाले नाही. यामुळे मागील नऊ महिन्यांपासून अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि अंतराळवीर बुच विल्मोर हे दोघे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरच आहेत.
सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोघेही नौदलाचे अनुभवी चाचणी वैमानिक आहेत. दोघेही बोईंगच्या स्टारलाइनर कॅप्सूलमध्ये बिघाड झाल्यामुळे अंतराळातून परतू शकले नव्हते. नासाने आयत्यावेळी दुर्घटना टाळण्यासाठी यानाचे वजन कमी ठेवण्याचा निर्णय घेतला. यासाठी अंतराळवीरांना थांबवून रिकामे कॅप्सून पृथ्वीवर आणण्यात आले. यानंतर अद्याप आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर असलेल्या अंतराळवीरांना परत आणण्यासाठी यान जाऊ शकलेले नाही.
नियोजनानुसार क्रू-१० अंतराळात पाठवण्यासाठी स्पेसएक्सरॉकेट केप कॅनाव्हेरल येथील केनेडी स्पेस सेंटर येथून भारतीय वेळेनुसार सकाळी ७.४८ वाजता प्रक्षेपित होणार होते. पण हे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले आहे. क्रू-१० यानातून अमेरिकेचे दोन, जपानचा एक आणि रशियाचा एक असे चार अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणार होते.