पुणे : शहरातल्या प्रवाशांना सुलभ प्रवासाचा आनंद घेता यावा म्हणून पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) बसमध्ये ‘पुढील थांबा उद्घोषणा’ ही स्वयंचलीत प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्येष्ठ, अपंग, दृष्टीहीन, महिला प्रवाशांना या सुविधेचा फायदा होणार आहे.
त्यानुसार ‘पीएमपी’च्या चार हजारांहून अधिक थांब्यांचे उद्घोषणा करणारे ध्वनीमुद्रणाचे (ऑडिओ रेकाॅर्डींग) काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच या यंत्रणेची चाचणी होणार असल्याची माहिती ‘पीएमपी’ प्रशासनाकडून देण्यात आली.
सार्वजनिक वाहतूक सेवेत मेट्रो, रेल्वे, आणि विमान प्रवाशांसाठी स्वयंचलित घोषणांची सुविधा उपलब्ध हे, मात्र अद्याप ‘पीएमपी’मध्ये या सुविधेचा अभाव आहे. त्यामुळे अनेकदा दृष्टिहीन, अपंग आणि वृद्ध प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण होणे, नियोजित थांबा ओळखण्यात अडचणी निर्माण होणे, ज्यामुळे थांबे चुकणे, असे प्रकार होत आहे.