जीवन संगीत – सद्गुरू वामनराव पै
आपण जो विषय निरूपणासाठी घेतलेला आहे तो म्हणजे परमेश्वर. याचे कारण असे की, परमेश्वर हा स्वर मानवी जीवनांत किंबहुना वैश्विक जीवनात अत्यंत महत्त्वाचा आहे. तो इतका महत्त्वाचा आहे की, परमेश्वर नाही तर सर्व शून्य व परमेश्वर आहे तर सर्व ब्रह्म. मी पुष्कळ वेळा सांगतो की, परमेश्वराला आपण ओळखू शकलो, अनुभवू शकलो, किमान पक्षी परमेश्वर म्हणजे काय हे जरी कळले तरी आपले पुष्कळ काम होईल. परमेश्वर कसा आहे, तो करतो काय हे पाहिले तर हे लक्षात येते की, परमेश्वर जसा आहे तसा आपल्याला कधीच आकळता येणार नाही. कोणालाही कोणत्याही जन्मात परमेश्वर जसा आहे तसा आकळता येणार नाही. उदाहरणार्थ-समुद्र.
समुद्र आपल्याला वरवर पाहता येतो. तो जसा आहे तसा संपूर्ण पाहता येत नाही तसे परमेश्वर हा वरवर पाहता येतो, जसा आहे तसा आकळता येत नाही. परमेश्वराबद्दल जितके आपण समजून घेऊ तितके कमी. परमेश्वराबद्दल जर आपल्याला थोडे जरी समजले तरी आपल्या समस्या दूर होतील, आपले गैरसमज दूर होतील. परमेश्वराचे रूप व स्वरूप आपल्याला समजले, तर आपल्या सर्व अंधश्रद्धा गळून पडतील हा सर्वात मोठा फायदा आहे. आपल्याला परमेश्वराचे रूप माहीत नाही व स्वरूपही माहीत नाही आणि आपण फक्त मूर्तीभोवती फिरत राहतो. कुठल्यातरी देवाची मूर्ती आपण घेतो. गणपती, शंकर, विठ्ठल अशी देवाची मूर्ती आपण घेतो आणि हाच आपला देव अशी कल्पना करतो व त्याच मूर्तीभोवती आपण फिरत राहतो. मी नेहमी सांगतो हे वाईट आहे असे नाही पण ते पूर्णतः योग्य आहे असेही नाही. एखादी मूर्ती आपला देव अशी कल्पना केलीत की तुम्ही इतरांपासून वेगळे पडणार. आपण गणपतीभक्त आहोत असे म्हणायला लागलात की विठ्ठलभक्तांबद्दल दुजाभाव निर्माण होणार.
विठ्ठलभक्त आहोत असे म्हणू लागलात की बाकीच्या भक्तांबद्दल दुजेपणा वाटणार. देवीभक्त झालात की इतरांबद्दल दुजाभाव. तुम्ही देवाला नावे व रूपे द्यायला सुरुवात केली अर्थात ती सोयीसाठी तर ते गैर आहे असे नव्हे, वाईट आहे असेही नव्हे, पण उपाय हा अपाय होता कामा नये. उपाय हाच जर अपाय झाला तर काय उपयोग? आज तसेच झालेले आहे. आज आपण एखादी मूर्ती हाच देव अशी कल्पना करतो व त्याच्याच भोवती आपण फिरत राहतो. एखादी मूर्ती हाच देव अशी कल्पना केली की, त्याला नवस करणे वगैरे वगैरे कर्मकांडे सुरू होतात. एकदा देवाचे Personification केलेत की सर्व कर्मकांडे त्याभोवती फिरू लागतात. कुठलेही कर्मकांड न करता तुम्हाला जर मूर्तिपूजा करता आली, तर तुम्हांला त्याचा फायदा होईल. तुकाराम महाराज हेच सांगतात. “करावे ही पूजा मनेची उत्तम, लौकिकाचे काम काय असे”. लौकिकाचे काहीच काम नाही. मनाने जर तुम्ही देवाची पूजा केली, तर ती संतांना जास्त प्रिय आहे.