मुंबई : मुंबईची जीवन वाहिनी म्हणजेच लोकल ट्रेन ही प्रत्येकाच्या आयुष्यातल्या दैनंदिन प्रवासाचा एक अविभाज्य भाग आहे. या लोकलवाहिनीने अनेक पिढ्या आणि त्यासोबत घडलेले अनेक प्रसंग पाहिले आहेत. लोकलवर दगडफेकीच्या घटना नित्याच्या झाल्याने रेल्वेने खिडक्यांवर जाळ्या बसवून घेतल्या. तरीही अधूनमधून दगडफेकीच्या घटना होत असतात. आता होळीच्या निमित्ताने पाण्याचे फुगे मारण्याचे प्रकारही सुरु आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी महिलांच्या डब्यात एक व्यक्ती नग्न अवस्थेत आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामुळे या जीवनवाहिनीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. टिटवाळाच्या चालत्या लोकलमध्ये अज्ञात व्यक्तीने दारुची बाटली फेकली. या घटनेत अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झाली.
स्वारगेट एसटी डेपोत तरुणीवर बलात्कार, चौघांचे निलंबन आणि २२ जणांची बदली
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.११ मार्च) रोजी रात्री साधारण ८.३० वाजता टिटवाळा लोकलच्या विरुद्ध दिशेने जाणाऱ्या ट्रेन मधून अज्ञात व्यक्तीने दारुची बाटली फेकली. ही दारुची बाटली पहिल्यांदा ट्रेन मधील पंख्याला लागली त्यानंतर बाटलीचे तुकडे डब्यात सर्वत्र पसरले असून त्यातील एक तुकडा अल्पवयीन मुलीला लागला. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी याबाबत चौकशी सुरू केली आहे. मात्र, ट्रेन भरधाव वेगाने असताना ही बाटली नक्की कोणी आणि कुठून फेकली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे