मुंबई : वाशीच्या मुंबई कृषी उत्पन्न धान्य बाजार समितीत डाळी, कडधान्यांची आवक वाढल्याने भावात घसरण झाली आहे. एपीएमसीत चणाडाळ १२ टक्के तर तूरडाळ ५ टक्के आणि सुक्या हिरव्या वाटाण्याचे भाव १४ टक्क्यांनी उतरले आहेत. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.गेल्या काही वर्षांपासून कमी पाऊस पडल्याने त्याचा कडधान्य उत्पादनावर परिणाम होऊन डाळीच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. किरकोळ बाजारात तूरडाळ, चणाडाळ आणि उडीद डाळ यांनी २०० रुपयांचा टप्पा गाठला होता. त्यामुळे महिलांना इतरत्र पर्याय उपलब्ध करून घ्यावे लागले होते. यंदा समाधानकारक पाऊस पडल्याने डाळींना अच्छे दिन आले आहेत.
एपीएमसी बाजारात महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश येथून डाळी दाखल होतात. कर्नाटकातील तूरडाळीचा हंगाम सुरू झाला असून, यंदा कर्नाटकात तूरडाळीची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. मराठवाडा, विदर्भ आणि गुजरातमधील तूरडाळीचा हंगाम सुरू झाला आहे. आवक वाढल्याने भावात घट झाली आहे. मागणीच्या तुलनेत आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने तूरडाळीच्या भावात प्रतिकिलोमागे ५० ते ६० रुपयांनी घसरण झाली आहे. गृहिणींच्या नित्याच्या वापरात तूर, मसूर, मूग, चणाडाळ असतेच. त्यामुळे महागाई होऊनदेखील या डाळींची मागणी तेवढ्याच प्रमाणात होती; मात्र यंदा जास्त उत्पादन झाल्याने गृहिणींना आखडता हात घेण्याची वेळ येणार नसल्याचे समोर येत आहे. विशेषतः यावर्षी बाजारात हरभरा, तूर आणि हिरवा वाटाणा यांची अधिक आवक होण्यास सुरुवात झाली असून, अधिक आवक वाढून भाव आवाक्यात येतील, अशी शक्यता व्यापारीवर्गातून होत आहे.
किरकोळ बाजारात तूरडाळ प्रतिकिलो १६० ते २०० रुपये; तर हिरवा वाटाणा २५० रुपयांनी विक्री होत होता. आता नवीन उत्पादन आल्याने तूरडाळ ११० ते १२० रुपये तर हिरवा वाटाणा १२० रुपयांवर उतरला आहे.