नागपूर : ‘औरंगजेब लुटारू होता, त्याचे कुटुंब लुटारू होते. भारत लुटण्यासाठी तो आणि त्याच्या खानदानाने येथे येऊन अत्याचार केले. अशी माणसे आपले आदर्श कधीच असू शकत नाहीत.’ असे रामदेव बाबा यांनी सांगितले. नागपुरात पतंजलीच्या फूड पार्कच्या उद्घाटन प्रसंगी रविवारी रामदेव बाबा बोलत होते. ‘छत्रपती शिवाजी महाराज हेच आमचे आदर्श आहेत’.असे त्यांनी ठणकावून सांगतानाच, बाबर काही भारतात काही घडवायला आला नव्हता. बाबर, अकबर, औरंगजेब त्यांची मुलं या सगळ्यांनी आपल्या हजारो आया-बहिणींची बेअब्रू केली. आपल्या देशाची ओळख पुसण्याचा प्रयत्न त्यांनी केला, असे रामदेव म्हणाले.
सध्या महाराष्ट्रात ‘छावा’ चित्रपटामुळे औरंगजेबावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. तसेच, समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेब उत्तम प्रशासक होता, असे विधान केले होते. यावरून मोठा वाद निर्माण झाला. याच पार्श्वभूमीवर रामदेव बाबांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
रामदेव बाबा यांनी पतंजली फूड पार्क आणि त्याच्या महत्त्वावरही प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, ‘या फूड पार्कची क्षमता दररोज ८०० टन आहे. यातून नैसर्गिक पद्धतीने ज्यूस तयार केला जाईल, त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल.’ त्यांनी पुढे सांगितले की, ‘संत्र्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी चांगल्या दर्जाची रोपे विकसित केली जातील. विदर्भातील संत्र्यांना देश-विदेशात निर्यात करण्यासाठी प्रयत्न केले जातील.”रामदेव बाबा ” जय जवान, जय किसान, जय मिहान” अशा घोषणा देखील दिल्या आणि महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”असे वचनही त्यांनी दिले.