Wednesday, March 19, 2025
Homeसाप्ताहिककोलाज‘मार्कार्थी’ आणि ‘स्वाध्यायी’

‘मार्कार्थी’ आणि ‘स्वाध्यायी’

गुरुनाथ तेंडुलकर

दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये पुस्तकांच्या बाजारात शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासाच्या पुस्तकांचा जणू एक महापूरच येतो. एकवीस अपेक्षित प्रश्नसंच, पंचवीस हमखास प्रश्नपत्रिका, एस. एस. सी. इंग्रजी-दोन दिवसांत, चोवीस तासांत संस्कृत वगैरे वगैरे… अशा प्रकारच्या पुस्तकांवर विद्यार्थ्यांच्या अगदी उड्या पडतात. कारण… कारण परीक्षेची तारीख जाहीर झालेली असते. अवघा दीड-दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक असतो आणि मुख्य म्हणजे बहुतेक विद्यार्थ्यांचा म्हणावा तसा अभ्यास झालेला नसतो. काही पाच, दहा टक्के विद्यार्थ्यांचा अपवाद वगळला, तर बहुतेक विद्यार्थी… परीक्षेचं टेन्शन आलंय, नीट अभ्यास झालेला नाही, कसं होणार कुणास ठाऊक?’ असं आपापसात बोलतांना आढळतात… आणि हे टेन्शन केवळ दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्याच बाबतीत नव्हे, तर अगदी सातवी-आठवी ते पदवी परीक्षेपर्यंत आणि कधीकधी त्यानंतरच्या परीक्षांच्या बाबतीतही असतं. काही विद्यार्थी, तर अगदी परीक्षेच्या साधारण आठवडाभर आधी अभ्यासाची पुस्तकं उघडतात… नेमकं काय वाचायचं…? केवढे विषय…? केवढे प्रश्न…? केवढा अभ्यास…? इंपॉर्टंट कोणतं आणि ऑप्शनला टाकायचं कोणतं…?’ विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो आणि अशा गोंधळलेल्या मनस्थितीतच अर्धवट अभ्यासाच्या आधारावर जमेल तसं परीक्षेला बसून पेपर लिहिले जातात… अशा प्रकारे गोंधळलेल्या विद्यार्थ्यांच्या मनात डोकावून पाहिलं तर बहुतेकजण अगदी भीष्माचार्याच्या थाटात एकच प्रतिज्ञा करताना आढळतील…’ यावर्षी टंगळ मंगळ करण्यात वेळ फुकट घालवला. पण पुढच्या वर्षी मात्र अगदी पहिल्या दिवसापासून… सगळी लेक्चर्स नीट अटेंड करायचे. नियमित अभ्यास करायचा…!

पंचतंत्रात कावळ्यांची एक गोष्ट आहे. त्या गोष्टीतल्या कावळ्याचे शेण अन् काटक्यांनी बांधलेले घरटे पावसाच्या माऱ्यानं वाहून जातात. कावळ्यांची वसाहत उघड्यावर पडते. पावसात कुडकुडणारे कावळे सभा घेतात आणि ठराव मंजूर करतात. ‘आता हा पावसाळा संपला की, ताबडतोब आपण सगळ्यांनी मिळून पक्की घरटी बांधायची…’ पावसाळा संपतो. कावळे केलेला ठराव विसरून जातात. पुन्हा पुढचा पावसाळा, पुन्हा तोच ठराव. प्रत्येक वर्षी पावसाळा येतो, कावळ्यांची घरं वाहून जातात. ‘पुढच्या वर्षी मात्र नक्की हं.’ असं सगळे कावळे एकमुखानं मान्य करतात. पण. पण कावळ्यांकडून पक्की घरटी कधीच बांधून होत नाहीत. व्यवस्थित अभ्यास न करता परीक्षेला बसणारे विद्यार्थी यावर्षी नीट अभ्यास न केल्याबद्दल पश्चात्ताप करतात आणि पुढच्या वर्षी सुरुवातीपासून अभ्यास करण्याचा संकल्प करतात. पण… पण… हा पश्चात्ताप म्हणजे केवळ स्मशान वैराग्य असतं… नियमित अभ्यास करण्याचा हा संकल्प परीक्षा संपल्या दिवशीच संपुष्टात येतो आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या…!

केवळ शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणापुरताच नव्हे, तर पुढे आयुष्यभर हा प्रकार असाच चालू राहतो आणि परिणामी जीवनातल्या कुठच्याच क्षेत्रात म्हणावं तसं नेत्रदीपक यश प्राप्त होत नाही… नियमितपणाची सवय अंगात बाणवून घ्यावी लागते… चांगल्या सवयी जाणीवपूर्वक जोपासाव्या लागतात. इंद्रियांना, मनाला, बुद्धीला वळण लावावं लागतं. पण गंमत म्हणजे माणूस हा जात्याच स्खलनशील असल्यामुळे, मन बहुतेक वेळा विपरीत दिशेकडेच धाव घेते. विपरीत दिशेनं धावणाऱ्या मनाला वळवून पुन्हा चांगल्या मार्गावर आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. प्रयत्नात जरा कसून झाली की संपलंच. पुन्हा गाडी मूळ पदावर जाण्यास वेळ लागत नाही. उंचावर दगड चढवणं अवघड पण तोच दगड उतारावरून खाली ढकलून देणं मात्र अत्यंत सोपं. चांगल्या सवयी लावणं म्हणजे चढावावर दगड वर चढवण्यासारखं कठीण काम. अगदी दैनंदिन व्यहारातलं उदाहरण द्यायचं तर… दररोज पहाटे लवकर उठून नियमितपणे व्यायाम करण्याचा संकल्प आपल्यापैकी बहुतेकांनी केलेला असतो. सकाळी लवकर उठून व्यायाम करण्याची सवय अत्यंत चांगली, याबद्दल कुणाचंही दुमत असण्याचं कारण नाही. आपणही व्यायाम करण्याचं मनाशी ठरवतो. संकल्पानुसार दोन चार दिवस पहाटे लवकर उठून व्यायाम करतो. मॉर्निंग वॉकला जातो. स्वतःलाच बरं वाटतं. आता हा व्यायाम अगदी नियमितपणे करायचा. काहीही झालं तरी त्यात खंड पाडायचा नाही असं मनापासून ठरवतो. काही दिवस किंवा अगदी काही आठवडे त्यानुसानर वागतो देखील. पण… पण काहीतरी निमित्त होतं. एखाद दिवशी रात्री झोपायला उशीर होतो आणि परिणामी दुसऱ्या दिवशी उठणं जीवावर येतं, ‘आजचा दिवस व्यायामाला विश्रांती देऊया.’ असा विचार करून आपण घड्याळाचा गजर बंद करतो आणि पांघरूण डोक्यावरून ओढून घेतो… हा एक दिवस केलेला आळस, व्यायामाचा नियमितपणा मोडण्यास पुरेसा ठरतो. पुढे पुढे व्यायामाच्या बाबतीत आपण नियमितपणे अनियमित होत जातो.

एक दंतकथा सांगतो… एका छोट्या देशात दरवर्षी इंद्राची पूजा करून पाऊस पाडण्यासाठी प्रार्थना करण्याची प्रथा होती. एका वर्षी काही तरी घडलं आणि दरवर्षीच्या पूजेत काही कसूर झाली. इंद्र भडकला. त्यानं त्या देशात पाऊस पाडणाऱ्या वरुणला बोलावून घेतलं आणि त्या देशात पुढची पाच वर्षे पाऊस न पाडण्याची आज्ञा दिली. सारे देशवासी घाबरले. देश सोडून इकडे तिकडे पळाले. ज्यांना इतरत्र जाणं शक्य नव्हतं ते जीव मुठीत घेऊन काय होईल ते सोसायचं असं म्हणून चेहरा पाडून बसले. दरवर्षी पावसाळ्याच्या आधी शेतीची कामं सुरू व्हायची. शेतकऱ्यांची लगबग सुरू व्हायची. त्यावर्षी मात्र पाऊस पडणार नव्हता. त्या वर्षीच नव्हे, तर पुढची पाच वर्षे पाऊस पडणार नव्हता. त्यामुळं भाजणी, नांगरणी वगैरे करण्यात काहीच अर्थ नव्हता. कुणीही आपल्या शेतात गेलं नाही. एका शेतकऱ्यानं मात्र अगदी नेहमीच्या प्रथेप्रमाणे शेताची मशागत सुरू केली. शेत नांगरून धान्य पेरण्याची तयारी केली. इतर सर्व गावकऱ्यांनी त्याला अगदी मूर्खात काढलं. तो शेतकरी मात्र त्या सर्वांकडे दुर्लक्ष करून शांतपणे आपल्या शेतात राबत होता. राजाला ही बातमी कळली. त्याचा विश्वासच बसेना. पुढची पाच वर्षे पाऊस पडणार नाही हे माहीत असून देखील एक शेतकरी शेतात राबतोय? अशक्य…! राजा स्वतः पाहायला गेला. शेतकरी खरोखरच शेतात राबत होता. घाम गाळत होता. राजानं त्या शेतकऱ्याला विचारलं, ‘अरे पुढची पाच वर्षे पाऊस पडणार नाही. तू उगाचच श्रम वाया का घालवतोस?’

शेतात राबणारा तो शेतकरी आपल्या कपाळावरचा घाम निथळून म्हणाला, ‘महाराज… पाच वर्षे पाऊस पडणार नाही हे मलासुद्धा ठाऊक आहे पण या पाच वर्षांत या मातीचा पार दगड होऊन जाईल आणि नंतर अशा शेतातून पीक काढणं अशक्य होईल. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे… मी शेतात काम करण्याची सवय सोडली तर… मी आळशी होईन, माझ्या शरीराला श्रम करण्याची सवय राहाणार नाही आणि पाच वर्षांनंतर ज्यावेळी पुन्हा पाऊस पडेल त्यावेळी मला शेतात राबावसं वाटणार नाही. श्रम करण्याची माझी चांगली सवय मोडू नये म्हणून मी जमीन नांगरली…’ राजानं दुसऱ्याच दिवशी सभा भरवली आणि त्या सभेत सगळा वृत्तांत सांगितला. लागलीच इतर सगळ्या शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात काम करायला सुरुवात केली… आठवडा उलटला आणि काय आश्चर्य, मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वरुणराजानं विजांच्या लखलखाटात ढगांच्या गडगडाटात गावावर जोरदार वर्षाव केला… इंद्रानं ताबडतोब वरुणाला बोलावून घेतलं आणि पाऊस पाडण्याबद्दल जाब विचारला. “तुला त्या गावावर पाच वर्षे पाऊस पाडू नकोस म्हणून आज्ञा दिली असताना देखील तू…” “होय देवा, आपली आज्ञा मी मोडली याबद्दल क्षमा करा. पण जर आपल्या आज्ञेचं पालन करून मी पाच वर्षे बरसलो नसतो, तर… तर कदाचित मी स्वतः बरसणंच विसरून गेलो असतो…” वरुण नम्र आवाजात उत्तरला नियमित अभ्यास करणं ही एक चांगली सवय. केवळ मार्कांसाठी आणि परीक्षेपुरता अभ्यास करणारा ‘मार्कार्थी’ आणि स्वतःच्या उन्नतीसाठी, आपला सर्वांगीण विकास व्हावा म्हणून प्रयत्न करणारा ‘स्वाध्यायी’ यांतला फरक मार्कात, तर प्रकर्षानं दिसतोच, पण त्याहूनही अधिक फरक पुढच्या आयुष्यात पावलोपावली जाणवतो.

केवळ मार्कावर डोळा ठेवून परीक्षेच्या आधी काही दिवस अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला ‘डिग्री’ मिळाली तरी ‘विद्या’ मात्र मिळतच नाही. गाईड वाचून ‘टक्के’ मिळतील पण ‘गुण’ मिळणार नाहीत.‘मार्क’ मिळतील कदाचित, पण ‘ज्ञान’ मिळत नाही… परीक्षा कधीही होवो… ती होवो किंवा न होवो. आपल्या नियमित अभ्यासात खंड न पडू देणं हाच उन्नतीचा महामंत्र…!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -