मुंबईतील एकंदर थिएटर अॅक्टिव्हिटीचा (नाट्य चळवळीचा) विचार करता दोन महत्त्वाच्या कालखंडांचा आता विचार करणे जरुरीचे आहे. तो कालखंड म्हणजे कोविड पूर्व कालखंड आणि कोविड पश्चात. या आधी तो १९९०-९२ च्या आधीचा म्हणजेच जागतिकीकरणाच्या अगोदरचा आणि १९९२ नंतरचा, असा विचारात घेतला जाई; परंतु १९९२ ते २०२५ या ४०-४५ वर्षांच्या कालावधीतच २०२२ पासूनच्या नाट्य वर्तुळातली स्थित्यंतरे विशेष लक्षात घेण्याजोगी आहेत. कोविडच्या आक्रमणाने गच्च होऊन पडलेल्या, जाम झालेल्या किंबहुना गंजत पडलेली नाटक इंडस्ट्री अधिकच डबघाईला आली. जागतिक स्तरावर या इंडस्ट्रीवर काय परिणाम झाला हे तपासण्या अगोदर त्याचा मुंबईतल्या अन्य भाषिक नाट्यपंढरीवर कसा परिणाम झाला, हा अभ्यास या लेखाद्वारे मांडण्याचा माझा तुटपुंजा प्रयत्न आहे.
मुंबईतील थिएटर अॅक्टिव्हिटी ही बहुभाषिक आहे. मराठी व्यतिरिक्त हिंदी, गुजराती, सिंधी, कन्नड आणि कोंकणी (गोव्यातील कोंकणी) भाषांतील नाट्यप्रयोग मुंबईत अधून-मधून सर्रास होत असतात. पैकी हिंदी नाटक मुंबईत रुजले आहे. पूर्वी हिंदी नाटके सादर होणारी काही विशिष्ट थिएटर्स होती. पृथ्वी, पाटकर, तेजपाल, भवन्स, भाईदास, बिर्ला मातोश्री, घाटकोपरचं झवेरबेन आणि थोड्याफार प्रमाणात पार्ल्याचं दीनानाथ व बोरिवलीचं प्रबोधन सोडलं तर हिंदी नाटके अन्य कुठल्याही नाट्यगृहात होत नसतं; परंतु त्यात एन.सी.पी.ए., सावरकर नाट्यगृह, यशवंतराव चव्हाण सेंटर आणि नुकत्याच सुरू झालेल्या नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर, बाबुलनाथचे बिर्ला सेंटर आणि मीरा रोडचे लता मंगेशकर इत्यादी नाट्यगृहे हिंदी नाटकांची पॉकेट्स बनली आणि हिंदी नाटक बहरले. मराठी नाटक जसे वीक डेजलाही चालते, तसे हिंदी नाटक फक्त आणि फक्त वीक एण्डलाच आणि सार्वजनिक सुट्ट्यांनाच चालते. साधारणतः सरासरी पाचशे प्रेक्षक संख्येवर २५-३० प्रयोग हा या नाटकांचा जीवित संक्रमण काळ समजला जातो. नंतर मात्र प्रेक्षक संख्या रोडावत जाते असे म्हणण्यापेक्षा डब्यातला चिवडा संपावा तसा हिंदी प्रेक्षक संपतो. पुढील नाट्यप्रयोग मग हिंदी सिनेमा चालवणारे जसे इतर भाषिक प्रेक्षक आहेत तसेच व तेच हिंदी नाटकांना जगवतात. देवेंद्र पेमचं ऑल दि बेस्ट आणि मनोज जोशी यांचं चाणक्य ही गेल्या काही वर्षांत प्रकर्षाने नोंद घ्यावीत अशी उदाहरणे आहेत. या नाटकांचा मूळ हिंदी प्रेक्षक संपलाय; परंतु रिपिट ऑडियन्स आणि अन्य भाषिकांच्या सहकार्यावर ही नाटके अधून-मधून चालू आहेत. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हिंदी नाटकांच्या मूळ प्रवाहावर मात्र कोविडमुळे बंद असलेल्या इंडस्ट्रीवर परिणाम झाला. एकतर हिंदी नाटकांसाठी कार्यरत असलेला चतुर्थ श्रेणी कामगार आपापल्या सोयींनुसार मुंबई बाहेर स्थलांतरित झाला होता. त्यामुळे सेट, कॉस्चुम, ट्रान्सपोर्ट यांसारख्या कामांसाठी कुशल कामगार मिळणे कठीण झाले होते. शिवाय बॅकलॉग भरून काढण्यासाठी तिकीट विक्रीच्या दरात केल्या गेलेल्या वाढीने प्रेक्षक संख्येत भयानक घट होत गेली. या घटलेल्या प्रेक्षक संख्येने हिंदी नाट्यसृष्टीचा चेहेरा-मोहराच बदलतं गेला.
हल्लीच “अनकही अंजली” या हिंदी नाटकाचा प्रयोग वर्सोव्याच्या वेदा-चौबारा नामक नाट्यगृहात पाहण्याचा योग आला. वरील दोन-तीन परिच्छेदात, जे हिंदी नाट्यनिर्मितीबाबत पाल्हाळ लावलंय ती एक दृष्टांत जाणीव आहे, हे नाट्यअभ्यासकांनी लक्षात घ्यावं. अंधेरीतील वर्सोवा इलाख्यात आराम नगर १ व आराम नगर २ या परिपेक्षात जवळपास छोटेखानी चौपन्न (५४) थिएटर्स आहेत, यावर तुमचा विश्वास तरी बसेल का? या थिएटर्सना सो कॉल्ड स्ट्रगलर्स वर्गामुळे एक परीभाषा निर्माण करून दिली जातेय. जी कोविड पश्चात मुंबईतल्या थिएटर अॅक्टिव्हिटीचे प्रमुख अंग आहे. छोटेखानी रंगमंच, छोटी प्रेक्षक व्यवस्था, छोटा अवकाश, छोटे कथानक, छोटे सादरीकरण आणि म्हणूनच छोटे तिकीट असूनही प्रचंड मोठ्ठा नाट्यानुभव…! आज मराठीतील हाच स्ट्रगलरवर्ग (हौशी/नवोदित) एकांकिका स्पर्धा नामक थुकरट चढाओढीत गुंतला आहे. स्वतःच्या क्षमतेच्या सादरीकरणाऐवजी स्वतःची कॉम्पिटीशन स्वतःच्याच स्पर्धकांबरोबर करण्यात धन्यता मानतोय. तेच हिंदीतील नवोदित, सादर करीत असलेले प्रत्येक छोटेखानी सादरीकरण आपला “पोर्टफोलिओ” म्हणून प्रस्थापित रंगकर्मींसमोर उलगडून दाखवित आहे. ही एक प्रकारची ऑडिशन नाही का? एखाद्या नटाची अभिनय क्षमता सहजगत्या एखाद्या कथानकाद्वारे तुमच्या समोर सादर होते तेव्हा ऑडिशन नामक स्पर्धेत तो सहजगत्या उत्तीर्ण झालेला असतो आणि मराठी नट बोंबलत फिरतायत की आमच्यावर अन्य भाषिक निर्माते अन्याय करतात. हिंदी हौशी रंगकर्मींना प्रस्थापित करण्यासाठी अमराठी भौगोलिक क्षेत्रात उभी केली गेलेली “सिस्टीम” खरोखर थक्क करून सोडणारी आहे. आपले मराठी प्रस्थापित नाट्यकर्मी निर्माते, नाटक हा नाट्यप्रकार हौशी, नवोदित वा स्ट्रगलर्स अशा मूलभूत घटकांना कुठले खतपाणी घालून विकसित करत आहे? हा माझा थेट सवाल, वर्सोवा क्षेत्रात विकसित झालेल्या हिंदी नाट्यचवळीच्या अानुषंगाने, मराठी प्रस्थापिताना आहे.
माझ्या पाहण्यात आलेला अनकही अंजली हा दीर्घांक एका डॉक्टरच्या आयुष्यात घडलेल्या चुकीच्या निर्णयांचा मनोविश्लेषणात्मक आलेख होता. आपण स्वतः घेतलेले निर्णय आणि आपल्या बाबत घेतले गेलेले निर्णय हे दोन्हीही चुकीच्याच बैठकीवर जर आधारित असतील तर काय वाताहत होते, हे अधोरेखित करणारा हा दीर्घांक अगदी सुरुवातीपासून प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो. सुरुवातीला काहीशा गूढ हाताळणीमुळे नाटक अॅबसर्ड पद्धतीचे असावे असा काहीसा भ्रम निर्माण होतो, मात्र नाटक जसजसे अधिक विस्तारले जाते तेव्हा ते रिअलिस्टीक बेस (वास्तवाची बैठक) असलेली गुंतागुंत सहज उकलत जाते. पंख थिएटर्स ही प्रस्तुती मुकुल नाग या क्रिएटिव्ह दिग्दर्शकाने अगदी सफाईने बांधली आहे. वंदना बोलार, अभिषेक या कलाकारांसमावेत मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या सुनील चौहानचा उल्लेख अत्यंत गरजेचा आहे. डॉक्टरच्या भूमिकेत त्याने दाखविलेले एकाकीपण, फ्रस्ट्रेशन, विचारांची गुंतागुंत अभिनयाचा पाठ सादर करते. कमाल म्हणजे या नाटकात तीन एन.एस.डी. स्नातकांचा समावेश होता आणि अनेक मान्यवर माझ्याबरोबर सहप्रेक्षक या नात्याने उपस्थित होते. आज या मुंबई स्थित गेल्या चार-पाच वर्षांत उगम पावलेल्या हिंदी नाट्यपॉकेटचा विस्तार आणि प्रमोशन पाहिले की सुस्तावलेल्या आणि नवोदितांकडे दुर्लक्ष करणाऱ्या मराठी प्रस्थापित रंगकर्मीना विचारावेसे वाटते, “कही इस अनकही कि वजह आप ही तो नही?”.
उच्च न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती मुंबई : विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर तोडक कारवाईप्रकरणी पालिकेचे विभाग…
स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर डायरेक्टोरेट ऑफ इर्फोसमेन्ट (ईडी)ने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली सोनिया गांधी व…
मुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी…
दक्षिण भारतीय साईभक्तांकडून सर्वाधिक मुकुट शिर्डी : ज्यांच्या चरणी श्रद्धा आणि सबुरीने नतमस्तक झाल्यावर माणसाचं…
'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका…
मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण…