केडीएमसी आणि किन्नर अस्मिता यांच्या संयुक्त विद्यमाने किन्नर महोत्सव २०२५ चे आयोजन!
कल्याण : आजच्या युगात मोठ्या प्रमाणात दुर्लक्षितअसणाऱ्या किन्नरांना देखील सन्मानाने जगण्याची संधी प्राप्त व्हावी, यासाठी शासनाने मार्च २०२४मध्ये महाराष्ट्र राज्याचे तृतीय पंथीयांसाठीचे धोरण जाहीर केले. या शासन निर्णयानुसार समाजाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर फेकल्या गेलेल्या तृतीयपंथीय व्यक्तींना जीवनाच्या मुख्य प्रवाहात आणून, त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, त्यांच्या पुर्नवसनासाठी प्रयत्न करावेत या हेतुने महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी समाज विकास विभागाचे उपआयुक्त संजय जाधव यास तृतीयपंथीयांसाठी शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि किन्नर अस्मिता या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी महापालिकेच्या आचार्य प्र.के.अत्रे रंगमंदिरात सकाळी ११ ते सायं.५ या वेळेत किन्नर महोत्सव-२०२५चे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास महापालिका क्षेत्रातील पदाधिकारी, इतर मान्यवर, महापालिका आयुक्त तसेच इतर अधिकारी वर्ग हे देखील उपस्थित राहणार आहेत. याचबरोबर सदर कार्यक्रमात आचार्य महामंडलेश्वर किन्नर आखाड्याच्या लक्ष्मी-नारायण त्रिपाठी, सखी चार चौघी ट्रस्टच्या संचालक श्रीगौरी सावंत, किन्नर माँ ट्रस्टच्या फाऊंडर डॉ. सलमा खान, दि हमसफर ट्रस्टचे सीईओ विवेक राज आनंद, आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याच्या डॉ.शिवलक्ष्मी नंदगिरी आईसाहेब, किन्नर अस्मितेच्या फाऊंडर गुरू निता केणे व किन्नर पंथीयांमधील इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात किन्नर समुदायातर्फे नृत्य व संगीताचे सादरीकरण करण्यात येणार असून, बहारदार स्टॅन्डअप कॉमेडी देखील केली जाणार आहे.
तृतीयपंथीय व्यक्तींना समाजात अधिक मान्यता मिळून तृतीयपंथी या समाजाचा एक भाग म्हणून अनुभवण्यास सक्षम होतील, हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. किन्नर समुदायामध्ये जनजागृतीच्या माध्यमातून महापालिकेच्या समाज विकास विभागामध्ये त्यांची नोंदणी केली जाणार आहे. तद्नंतर त्यांचे बचतगट स्थापन करणे, त्यांना महापालिकेमार्फत विविध कौशल्य व रोजगाराबाबत मोफत प्रशिक्षण देवून, त्यांच्यासाठी स्वयंरोजगारासाठी उद्युक्त करणे, तृतीय पंथीयांना विविध शासकिय कल्याणकारी योजनेअंतर्गत लाभ मिळून देणे, यासाठी महापालिकेमार्फत सहाय्य केले जाणार आहे.