Tuesday, March 25, 2025
HomeUncategorizedपालघर जिल्ह्यातील साडेचार लाख वाहनधारकांनी फिरवली पाठ

पालघर जिल्ह्यातील साडेचार लाख वाहनधारकांनी फिरवली पाठ

उच्च सुरक्षा नोंदणी प्लेटसाठी केवळ १४ हजार अर्ज

विरार : एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व दुचाकी, तीन चाकी आणि चार चाकी वाहनांना सुरक्षेच्या दृष्टीने अत्याधुनिक (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) उच्च सुरक्षा नोंदणी पाटी बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. असे असले तरी पालघर जिल्ह्यातील वाहनधारकांमध्ये मात्र ही नंबर प्लेट बसविण्यासाठी निरुत्साहीपणा दिसून येत असून जिल्ह्यातील साडेचार लाखांहून अधिक वाहनधारकांनी अद्याप अर्जच केले नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

वाहनांची चोरी, गैरवापर टाळण्यासोबतच अपघात झाल्यास संबंधित वाहन मालकाची सर्व माहिती सहजपणे मिळविण्यासाठी एप्रिल २०१९ नंतरच्या सर्व दुचाकी, तीन चाकी आणि चार चाकी वाहनांना अत्याधुनिक सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्यात येत आहेत. नवीन वाहन खरेदी केल्यानंतर वितरकाकडूनच ही नंबर प्लेट उपलब्ध करून दिली जाते. मात्र एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना अशा प्रकारची नंबर प्लेट बसविण्यात आलेली नाही.

तृतीयपंथीय व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुढाकार

त्यामुळे वाहनांची सुरक्षा वाढवण्याच्या दृष्टीने एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांवर अत्याधुनिक हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट लावण्यात येत आहेत. संपूर्ण देशात ही प्रक्रिया सुरू असून महाराष्ट्रामध्ये ३० एप्रिल २०२५ या तारखेपूर्वी अत्याधुनिक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन असलेली नंबर प्लेट बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे.

यासाठी सर्वच शहरांमध्ये अधिकृत केंद्र देखील उघडण्यात आलेले आहेत. तसेच वाहनधारकांना स्वतःदेखील ऑनलाईन प्रक्रिया करून हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट मिळवता येणार आहे. दरम्यान, एप्रिल २०१९ पूर्वीची ४ लाख ७८ हजार ९३१ वाहने पालघर जिल्ह्यात आहेत. त्यापैकी केवळ १३ हजार ४६३ वाहनधारकांनी ५ मार्चपर्यंत उच्च सुरक्षा नोंदणी प्लेटसाठी अर्ज केलेले आहेत, तर ३ हजार ९०७ वाहनांना ह्या नंबर प्लेट बसविण्यात आल्या आहेत. परिणामी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट वाहनांना बसविण्यासाठी पालघर जिल्ह्यातील वाहनधारकांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे.

एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी पाटी बसविण्याबाबत आवश्यक जनजागृती करण्यात येत आहे. भविष्यातील दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी पालघर जिल्ह्यातील वाहनधारकांनी अधिकृत केंद्रात नोंदणी करून वाहनांना नंबर प्लेट बसविण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. – अतुल आदे प्रादेशिक परिवहन अधिकारी, पालघर

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -