अदिती तटकरे
(महिला, बालविकास मंत्री महाराष्ट्र)
राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शासन काम करीत आहे. कालबद्ध कार्यक्रम राबविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार शंभर दिवसांची रूपरेषा आणि पुढील आराखडा महिला व बालविकास विभागातर्फे तयार करण्यात आला आहे. त्यानुसार महिला व बालकांच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकासासाठी विभागाची मंत्री म्हणून या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे. महिलांना आर्थिक सहाय्यातून उद्योग व व्यवसायाकडे वळता यावे, यासाठी यशस्वीपणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात आली आहे. विभागाने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध संस्थांच्या माध्यमातून लघू उद्योगासाठी मार्गदर्शन देऊन आर्थिक सहाय करण्यास सुरुवात केली आहे. महिला धोरणाच्या अंमलबजावणीत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, मुलींचा शिक्षण क्षेत्रामध्ये अधिकाधिक सहभाग वाढवणे, माध्यमिक तसेच उच्च शिक्षणाकडे वळवणे यांसारखे महत्त्वपूर्ण उद्दिष्टे समोर ठेवण्यात आले आहेत. विभागाच्या वतीने ‘गुलाबी रिक्षा’ योजना तसेच लेक लाडकी, मनोधैर्य योजना अधिकाधिक प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. ॲसीड हल्ल्यासारख्या घटनांतील पीडित महिलांना चांगल्या पद्धतीने उपचार देऊन त्यांचे मनोबल खचू नये या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी मनोधैर्य या योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. उद्योगाला सहाय्य करण्यासाठी उद्योग विभागात तसेच महिलांमधील कौशल्य विकसित करण्याच्या दृष्टीने कौशल्य विकास विभागाच्या अंतर्गत देखील अनेक योजनांचा समावेश आहे. महिलांसाठी धोरण आखत असताना प्रत्येक विभागाने महिलांसाठी योजना राबवाव्यात, अशा पद्धतीने शासन कार्य करीत आहे.
महिला आर्थिक विकास महामंडळाचे यशस्वी सुवर्ण महोत्सवी वर्षे सुरू आहे. ज्या महिलांना गृह तसेच लघू उद्योग सुरू करायचे आहेत, त्यांना बँकांसोबत जोडून प्रणाली सुव्यवस्थित करणे, आर्थिक सहाय्य करणे, उद्योगांसाठी प्रोत्साहन देणे इत्यादी गोष्टी याद्वारे केल्या जातात. ५० वर्षे अविरत सुरू असणारे महिला आर्थिक विकास महामंडळ असणारे महाराष्ट्र हे आदर्श व एकमेव राज्य आहे. एक लाखांपेक्षा अधिक बचत गट व दहा लाखांपेक्षा अधिक महिला महामंडळाने जोडलेल्या आहेत, त्यांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्याचे काम महामंडळ करीत आहे.
बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी व संरक्षणासाठी राज्य बालहक्क संरक्षण आयोगामार्फत विभाग कार्य करीत आहे. बालकांना शिक्षणाकडे वळवणे, बालकांचे मूलभूत अधिकार संरक्षित ठेवणे, बालविवाहांचे प्रमाण कमी करणे या दृष्टीने आयोगामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. याव्यतिरिक्त मुलींचे माध्यमिक शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. ते वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. पुढील काही वर्षांमध्ये मुलींचे माध्यमिक व उच्च शिक्षणाकडे वळण्याचे प्रमाण हे वाढलेले नक्कीच दिसून येईल असे मी या निमित्ताने शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलींना आश्वस्त करू इच्छिते. बाल धोरण विकसित करीत असताना एक महिला मंत्री म्हणून राज्यातील बालकांच्या सुरक्षेसह आरोग्याच्या समस्याही प्राधान्य क्रमाने सोडविण्यासाठी योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. अंगणवाडी सेविका हा आमच्या विभागाच्या विकासाचा कणा असून गर्भवती स्त्रीला पोषण युक्त आहार देणे, मार्गदर्शन करणे, बाळ जन्माला आल्यावर पहिल्या हजार दिवसांमध्ये संगोपन कसे करावे, आईच्या दुधाचे महत्त्व, पोषणाचे महत्त्व या सगळ्या गोष्टींची माहिती अंगणवाडी सेविका देत असतात. नवीन शिक्षण धोरणानुसार अंगणवाडी सेविकांची भूमिका ही वाढली आहे.
शासनामार्फत जेव्हा एखादी महत्त्वाकांक्षी योजना राबवली जाते तेव्हा ती योजना राबविण्याची संधी विभाग म्हणून मला मिळाली आहे ही खऱ्या अर्थाने अभिमानाची बाब असते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फार कमी वेळामध्ये अतिशय यशस्वीरीत्या आम्ही राबवू शकलो. अडीच कोटींपेक्षा अधिक महिला या योजनेचा लाभ घेत असताना शासनाच्या संपर्कात आल्या. एखादी योजना यशस्वीरीत्या महिलांपर्यंत पोहोचणे आणि त्याबाबत महिलांना उत्सुकता असणे या सगळ्या गोष्टी आनंददायी आहेत. अनेक योजना येत असतात त्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे पहिले आव्हान असते. पण ही योजना घोषित केल्यापासून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्याचप्रमाणे सकारात्मक, नकारात्मक, काही टीकात्मक अशा सगळ्या बाजूने प्रतिक्रिया आल्या; परंतु या योजनेने महिलांमध्ये एक ऊर्जा निर्माण केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ही योजना अशीच पुढे सुरू राहणार आहे. या योजनेचे पुढील पाऊल म्हणजे आर्थिक साक्षरता. याचेच उदाहरण म्हणजे या योजनेतून अनेक महिलांनी छोटे-मोठे उद्योग सुरू केले. दर महिन्याला १५०० रुपये खात्यात जमा होतात त्याची बचत राहिली पाहिजे किंवा गुंतवणूक कशा पद्धतीने करावी जेणेकरून महिलांना पुढील काही वर्षांमध्ये आर्थिकरीत्या सक्षम होण्याच्या दृष्टीने बचत राहील, स्वतःचा निधी निर्माण होईल त्या दृष्टिकोनातून मॉडेल तयार करण्यात येत आहे.
जागतिक महिला दिनाच्या दृष्टीने एवढेच सांगेन की, महिलांनी स्वतःला विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलावीत. हे शासन आपल्याला यशस्वी करण्याच्या दृष्टीने नेहमीच कटिबद्ध आहे. भारतातील स्त्री स्वातंत्र्यासाठीचा संघर्षाचा इतिहास पाहता स्त्रीने स्वतःचे अस्तित्व साजरे करायला हवे. प्रत्येक महिलेने स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. रूढी परंपरेतून बाहेर पडण्यासाठी स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक स्त्रीला व मुलीला माझ्या शुभेच्छा!