मुंबई : स्त्री म्हणजे वात्सल्य, मांगल्य, मातृत्व आणि कर्तृत्व यांचा सुंदर संगम आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध वारशात महिलांचे योगदान मोठे आहे. देशाचे स्वातंत्र असो किंवा कुठल्याही सुधारणांसाठी केलेले आंदोलन असो महिला कधीही मागे राहिल्या नाहीत. अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधान परिषदेत महिलांच्या कर्तृत्वाची गाथा व्यक्त उलगडली.
विधान परिषदेच्या विशेष अधिवेशनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महिलांच्या सशक्तीकरणावर भाष्य करत त्यांच्या योगदानाचा गौरव केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात त्यांनी महिला सशक्तीकरणासंदर्भात सरकारच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महिलांसाठीच्या विविध योजनांचा उल्लेख केला. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ ही स्त्रीत्व, मातृत्व आणि नारीशक्तीचा सन्मान करणारी योजना आहे. महिलांनी विश्वास दाखवत या योजनेला यश मिळवून दिले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे आदर्श शासक होते, तर अहिल्यादेवी होळकर या महिला राज्यकर्त्यांमध्ये सर्वोत्तम होत्या. त्यांनी आपल्या कारकिर्दीत रस्ते, पूल, विहिरी, तलाव यांसारखी विकासकामे केली आणि जनतेसाठी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या, असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली महिलांना संधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठी आणि आत्मसन्मान प्राप्त करण्यासाठी अनेक संधी निर्माण झाल्या. आज महिला लष्करात भरती होत आहेत, संरक्षण सेवांमध्ये योगदान देत आहेत, तसेच चांद्रयान, मंगळयान आणि सूर्ययान या अंतराळ मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. अनेक महिला मोठ्या कंपन्यांचे नेतृत्व करत असून देशाच्या प्रमुख पदांवर महिला कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.
महिला सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण पावले
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की, महिला सशक्तीकरणासाठी सुरक्षेच्या उपाययोजनांवर भर दिला जात आहे. शासकीय दवाखाने, पोलीस ठाणे, बसस्थानके, शासकीय इमारती महिलास्नेही व्हाव्यात, यासाठी महत्त्वपूर्ण धोरणे राबवली जात आहेत. तंत्रज्ञानाच्या मदतीने महिलांच्या सुरक्षेसाठी यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येत आहे.
महिलांच्या आरोग्यासाठी विशेष योजना
महिला आरोग्य सुरक्षेसाठी सरकार विशेष लक्ष देत आहे असे सांगून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की, ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्व्हायकल कॅन्सरच्या निदानासाठी मेमोग्राफी व्हॅन्स गावागावात पाठवण्यात येत आहेत. यामुळे प्राथमिक तपासणी लवकर होऊन महिलांना वेळेत उपचार मिळू शकतील. माता सुरक्षित असेल तर कुटुंब सुरक्षित राहील, हा विचार ध्यानात ठेवून विविध आरोग्य योजना राबवल्या जात आहेत.
महिलांसाठी रोजगार आणि उद्योग व्यवसाय संधी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की, महिला उद्योग आणि स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी ३५% अनुदान देण्यात येत आहे. स्टार्टअप योजनांसाठी विशेष अनुदाने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. महिलांना पिंक रिक्शा आणि महिला स्टार्टअप योजनांसारख्या विविध उपक्रमांतून स्वावलंबी बनवले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
शालेय शिक्षण आणि स्वच्छता
शाळांमध्ये मुलींसाठी विशेष सुविधा निर्माण केल्या जात असून स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जात आहे. शासकीय आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुधारणा करून त्यांना आधुनिक स्वरूप दिले जात आहे. यामुळे खासगी शाळांमधील विद्यार्थीही आता सरकारी शाळांकडे आकर्षित होत असल्याचा विशेष उल्लेख यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी आर्वजून केला.
महिला वर्ष, महिला दशक, महिला शतक
महिला दिन साजरा करण्यापेक्षा महिला वर्ष, महिला दशक आणि महिला शतक साजरे करण्याची आवश्यकता आहे, असे उपमुख्यमंत्र्यांनी नमूद केले. महिलांचे योगदान हा केवळ एक दिवसाचा विषय नसून, समाजाच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील राहण्याची गरज आहे.
आईच्या नावाचा सन्मान
महिला सन्मानाच्या दिशेने एक ऐतिहासिक निर्णय घेत सरकारने व्यक्तीच्या नावाच्या पुढे आईचे नाव लावण्याचा निर्णय घेतला आहे. हा एक मोठा बदल असून महिलांच्या महत्वाच्या भूमिकेला दिलेली खरी दाद आहे. महिला सशक्तीकरण आणि त्यांचे सर्वांगीण संरक्षण हे सरकारचे प्राथमिक उद्दिष्ट असून, भविष्यातही महाराष्ट्र सरकार महिलांसाठी अधिकाधिक प्रभावी योजना राबवणार असल्याचेही प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यावेळी केले.