विरार : वसई विरार महापालिका क्षेत्रात पालिकेकडून पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या नागरिकांना एक एप्रिल २०२५ पासून १ हजार लिटर पाण्यासाठी १३ रुपये ४० पैसे मोजावे लागणार आहेत. तर व्यावसायिकांना २६ रुपये ८० पैसे पाण्यासाठी लाभकर म्हणून द्यावे लागणार असून, घराच्या कर आकारणी मध्ये सुद्धा वाढ केली जाणार आहे. दरम्यान वसई विरार महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हिरवाडे मुख्य वित्त लेखाधिकारी इंद्रजीत गोरे यांनी शुक्रवारी सन २०२४-२५ चा सुधारित व सन २०२५-२६ चा मूळ ३ हजार ९२६ कोटी ४४ लक्ष ५१ हजार रुपयाचा अर्थसंकल्प आयुक्त तथा प्रशासक अनिल कुमार पवार यांच्याकडे सादर केला.
महापालिका क्षेत्रातील रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासोबतच आरोग्य विषयक अशा अनेक बाबी सामान्य नागरिकांना सहज उपलब्ध व्हाव्यात तसेच महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करून विकासाला गती मिळावी यासाठीचा हा अर्थसंकल्प असल्याची माहिती आयुक्त अनिल कुमार पवार यांनी यावेळी दिली . वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना प्रति एक हजार लिटर पाण्या मागे पाणीपुरवठा लाभकर म्हणून केवळ आठ रुपये याप्रमाणे आकारणी करण्यात आलेली आहे इतर पालिकेच्या तुलनेत ही आकारणी अल्प आहे. महापालिका क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या एमएमआरडीएला महानगरपालिका दरवर्षी ९० कोटी रुपये देते. त्या तुलनेत नागरिकांकडून मात्र अपेक्षित रक्कम मिळत नाही. त्यामुळे एक एप्रिल २०२५ पासून नागरिकांना १ हजार लिटर पाण्यासाठी १३ रुपये ४० पैसे पाणीपुरवठा लाभ कर आकारणी करण्यात येणार आहे तसेच व्यावसायिक वापर करणाऱ्या मालमत्ताधारकांकडून एक हजार लिटर पाण्यासाठी २६ रुपये ८० पैसे घेण्यात येणार आहेत.
वसई विरार महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून किंवा त्यापूर्वीपासून म्हणजेच २००६ पासून पालिकेने कर वाढ केलेली नाही. त्यामुळे पालिका प्रशासन महसूल हानी करत असल्याचा ठपका शासनाच्या महालेखाकारांनी ठेवला आहे. त्याचप्रमाणे रखडलेल्या प्रकल्पांसाठी महापालिकेचा हिस्सा म्हणून कोट्यावधी रुपये शासनाकडे जमा करावयाचे आहेत. त्यामुळे महापालिकेचे उत्पन्न वाढविणे आवश्यक आहे. परिणामी महानगरपालिकेने मालमत्ताधारकांना सरसकट कर वाढ न करता त्यांच्या घराचे बांधकाम यांचे वर्गीकरण करून मालमत्ता कर वाढ करण्यात येणार असल्याचे आयुक्त पवारांनी सांगितले. उपयुक्त समीर भूमकर, नानासाहेब कामठे ,अजित मोठे, मुख्य वैद्यकीय अधिकारी भक्ती चौधरी यांच्या अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम
महानगरपालिका क्षेत्रात ३२ आयुष्यमान आरोग्य मंदिर सुरू करण्यात आले असून आणखी 13 आरोग्य मंदिरे तीन महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहेत. कॅन्सर ग्रस्त रुग्णांना सवलतीच्या दरात उपचार मिळावे म्हणून लीलावती हॉस्पिटल चा प्रशासनाला नालासोपारा पश्चिम भागात आरक्षित असलेली जमीन देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मृतदेहाचे शव विच्छेदन महापालिकेच्या रुग्णालयात व्हावे यासाठी जे जे हॉस्पिटल मध्ये डॉक्टरांना प्रशिक्षण दिल्या जाणार आहे यासह अनेक आरोग्याच्या सुविधा वसई विरारकरांना मिळणार आहेत.
ई-कार्यालय करणार सुरू
नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक एप्रिल २५ पासून ई- ऑफिस सुरू करण्यात येणार आहे. २३२ कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येऊन हे कामकाज सुरूकेल्या जाणार आहे. यामुळे प्रकरणी प्रलंबित राहणार नाहीत अशी आशा आयुक्तांनी व्यक्त केली.
भविष्यातील पाणीपुरवठ्यचे नियोजन
वसई विरार महापालिका क्षेत्रात सध्या ४०२ एम एल डी पाण्याची गरज आहे. सन २०३१ पर्यंत ५३२ एम एल डी पाणी लागणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे असे विरार साठी असलेल्या दोन्ही पॅकेजची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत.
नगररचना विभाग स्वीकारणार धनादेश
इमारत विकास कामांच्या परवानगीसह इतर कामांसाठी स्वीकारण्यात आलेले धनादेश अनादरीत झाल्यास रक्कम वसुलीसाठी मोठी प्रक्रिया करावी लागत असे त्यामुळे महापालिकेकडून धनादेश स्वीकारण्यात येत नव्हते. यापुढे मात्र विशेष दंड आकारणे आणि मुदत वाढवून दुसरा धनादेश किंवा रोख रक्कम स्वीकारण्याच्या सुधारणेसह नगररचना विभागाकडून आता धनादेश देखील स्वीकारण्यात येणार आहेत.