Tuesday, May 13, 2025

मनोरंजनताज्या घडामोडी

विठूनामाच्या गजरात 'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार' रिअ‍ॅलिटी शो'चे शीर्षकगीत भेटीला

विठूनामाच्या गजरात 'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार' रिअ‍ॅलिटी शो'चे शीर्षकगीत भेटीला

मुंबई : टाळमृदंग घेऊन विठूनामाच्या गजरात... मंगलमय वातावरणात… पुण्यातला लक्ष्मी रस्ता, कसबा पेठ परिसर भक्तिमय झाला. निमित्त होतं सोनी मराठी (Sony Marathi) वाहिनीच्या येणाऱ्या नव्या रिअ‍ॅलिटी शोच्या शीर्षकगीताच्या चित्रीकरणाचं. मराठी संस्कृतीचा वारसा जपत नावीन्यपूर्ण कार्यक्रम देण्याचा प्रयत्न सोनी मराठी वाहिनी नेहमीच करत आली आहे. ही परंपरा कायम ठेवत, भक्ती आणि मनोरंजन यांचा मिलाफ साधत सोनी मराठी वाहिनी ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ हा नवा रिअ‍ॅलिटी शो प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. कार्यक्रम १ एप्रिलपासून सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar)



'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार' या कार्यक्रमाच्या शीर्षकगीताचं चित्रीकरण नुकतंच पुण्यात झालं. गीतकार ईश्वर अंधारे यांच्या लेखणीतून उतरलेलं ‘इठ्ठल इठ्ठल, संग म्हणायला चला चला चला कीर्तनाला चला' हे गाणं संगीतकार हर्ष-विजय यांनी संगीतबद्ध केलं आहे. गायक हृषीकेश रिकामे यांचा स्वरसाज या गाण्याला लाभला आहे. सुप्रसिद्ध छायाचित्रकार महेश लिमये यांच्या नजरेतून हे गाणं चित्रित झालं आहे. (Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar)

‘पंढरीची वारी’ हा महाराष्ट्राचा सामाजिक-सांस्कृतिक असा अनमोल ठेवा आहे. वारीची दिव्य परंपरा सोप्या आणि साध्या शब्दांत उलगडत गाण्याच्या माध्यमातून हा भव्य आणि अनुपम सोहळा जसाच्या तसा दाखवण्याचा प्रयत्न सोनी मराठी वाहिनी करत आहे. तो रसिकांना नक्कीच आवडेल असा विश्वास छायाचित्रकार महेश लिमये यांनी व्यक्त केला.


‘नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी।।’ असं म्हणत आजवर असंख्य कीर्तनकारांनी कथा, विनोद, दैनंदिन घडामोडी यांच्या आधारानं कीर्तन करत जनजागृती केली. सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या कार्यक्रमातून महाराष्ट्रातल्या कीर्तनकारांचा शोध घेतला जाणार आहे. टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच कीर्तनकारांवर आधारित रिअ‍ॅलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यासाठीच्या ऑडिशन्स नुकत्याच पूर्ण झाल्या. महाराष्ट्रातल्या ३६ जिल्ह्यांच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या स्पर्धकांनी या ऑडिशन्सना भरघोस प्रतिसाद दिला. स्पर्धकांची निवड सुरू झाली असून ‘चला चला चला कीर्तनाला चला' या उत्साहपूर्ण शीर्षकगीतामुळे स्पर्धकांचा हुरूप वाढला आहे. हे गाणं सर्व वयोगटांतल्या व्यक्तींची कीर्तनाची ओढ वाढवेल हे नक्की...! (Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar)

Comments
Add Comment