पुणे : काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) पुणे जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देत पुण्यातील हॉटेलला बर्गर किंग (Burger King) नाव वापरण्यात मनाई कली होती. या निर्णयाविरोधात पुण्यातील हॉटेलने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेत या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता या निर्णयाला स्थगिती मिळाली असल्यामुळे पुण्यातील बर्गर किंग हॉटेलला दिलासा मिळाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेडमार्कचे उल्लंघन केल्याप्रकरणी नेमसेक रेस्टॉरंटविरुद्ध दाखल दावा कनिष्ठ न्यायालयाने फेटाळून लावण्याच्या निर्णयाला अमेरिकन कंपनीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर अमेरिकन कंपनीने दाखल केलेल्या याचिकेची न्यायमूर्ती अनिल चांदूरकर आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठाने दखल घेत याबाबत सुनावणी होईपर्यंत पुण्यातील रेस्टॉरंटला ‘बर्गर किंग’ (Pune Burger King) नाव वापरण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे पुण्यातील हॉटेलने सर्वोच्च न्यायालयाकडे स्थगिती देण्याची मागणी केली.
दरम्यान, सध्या सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली असली तरी याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी सुरु ठेवण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. आज न्यायमूर्ती बी. व्ही. नागरथना आणि न्यायमूर्ती चंद्रा शर्मा यांच्या खंडपीठाने याबाबतचा निकाल दिला आहे.
‘सर्वोच्च न्यायालय तुर्तास पुण्यातील हॉटेलला ‘बर्गर किंग’ हे नाव वापरण्याची परवानगी देते आहे. तसेच याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जी सुनावणी सुरु आहे, ती पुढे सुरु ठेवण्याचा निर्देशही आम्ही देतो आहे’, असं न्यायमूर्ती बी.व्ही. नागरथना आणि न्यायमूर्ती चंद्र शर्मा यांच्या खंडपीठानं म्हटलं आहे. (Pune Burger King)