नवी दिल्ली : केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाची (सीएपीएफ) भरती परीक्षा आता मातृभाषेत देता येणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. रानीपेट येथील अरक्कोनम येथे आज, शुक्रवारी आयोजित केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) ५६ व्या स्थापना दिन समारंभात ते बोलत होते. यावेळी सीआयएसएफ परेडचा आढावाही घेतल्यानंतर गृहमंत्र्यांनी सीआयएसएफच्या १२७ हुतात्मा सैनिकांना श्रद्धांजली वाहिली आणि २२ सैनिकांना सन्मानित केले. यापैकी १० सैनिकांना राष्ट्रपती पोलीस पदक आणि १० सैनिकांना शौर्य पदक प्रदान करण्यात आले. याशिवाय, सीआयएसएफ कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी ८८ कोटी रुपये खर्चाच्या ६ नवीन प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी गृहमंत्र्यांनी सांगितले की, आतापर्यंत सीएपीएफ भरतीमध्ये मातृभाषेला स्थान नव्हते, परंतु पंतप्रधान मोदींनी निर्णय घेतला की आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व भाषांमध्ये परीक्षा देण्याची सुविधा असेल, ज्यामध्ये तामिळचाही समावेश असेल. त्यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना राज्यात तमिळ भाषेत वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी पावले उचलण्याची विनंती केली. यामुळे केवळ मातृभाषेला प्रोत्साहन मिळणार नाही तर तमिळ भाषेत परीक्षा देणाऱ्या तरुणांना समान संधी देखील मिळेल. गेल्या ५६ वर्षात सीआयएसएफने देशाच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
Shrilanka Navy : श्रीलंकेच्या नौदलाकडून १४ भारतीय मासेमारांना अटक
सीआयएसएफशिवाय भारतातील उद्योग, व्यापार, पर्यटन आणि संशोधन केंद्रांच्या सुरक्षेची कल्पनाही करता येणार नाही. पंतप्रधान मोदी यांनी २०२७ पर्यंत भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ बनवण्याचा संकल्प केला आहे, असेही त्यांनी सांगितले. हे ध्येय साध्य करण्यासाठी सीआयएसएफची भूमिका महत्त्वाची असेल.
सीआयएसएफ दररोज देशभरातील १ कोटींहून अधिक लोकांची सुरक्षित हालचाल सुनिश्चित करते. सीआयएसएफने विमानतळांची सुरक्षा हाती घेतल्यापासून सुरक्षेत कोणतीही मोठी चूक झालेली नाही, असेही त्यांनी सांगितले. नवीन संसद भवन, दिल्ली मेट्रो, समुद्री बंदरे आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेची जबाबदारी सीआयएसएफची आहे. गृहमंत्र्यांनी सांगितले की, दरवर्षी सीएपीएफद्वारे १ लाखाहून अधिक तरुणांची भरती केली जात आहे. यापूर्वी २०२४ मध्ये १४ हजार पदांसाठी भरती करण्यात आली असून ५० हजार पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या निर्णयामुळे देशभरातील तरुणांना त्यांच्या मातृभाषेत परीक्षा देऊन सीएपीएफमध्ये दाखल होण्याची उत्तम संधी मिळेल.