रामेश्वरम : तामिळनाडूच्या पांबन भागात मारेमारी करणाऱ्या १४ भारतीय मासेमारांना श्रीलंकेच्या नौदलाने अटक केली आहे. सीमापार मासेमारी केल्याचा आरोप करीत श्रीलंकेचे नौदल या मासेमारांना मन्नार नाविक तळावर घेऊन गेल्याची माहिती रामेश्वरम मासेमार संघटनेने दिली.
श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी २३ फेब्रुवारी रोजी बेट समुद्र सीमा ओलांडल्याचा आरोप करत ३२ भारतीय मासेमारांना अटक करून ५ बोटी जप्त केल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा १४ जणांना अटक करण्यात आलीय. यावर्षी श्रीलंकेच्या नौदलाने आतापर्यंत १५० भारतीय मासेमारांना अटक करून १८ बोटी जप्त केल्या आहेत.
मासेमारीवरून भारत-श्रीलंका यांच्यात बरेचदा वादावादी होत असून श्रीलंकेच्या नौदलाचा हस्तक्षेप दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या विषयावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे आणि केंद्र सरकारकडून त्वरित हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी एक संयुक्त कार्यगट स्थापन करण्याची विनंती केली आहे.