Share

श्री गुरुगाथा – अरविन्द दोडे

पै योगिवृंदे वहिली |
आडचि आकाशी निघाली |
की तेथ अनुभवाच्या पाऊली |
धोरणु पडिला ॥६.१५४॥

त्मसंयोग साधताना अंत:करण आणि देह यांचं संयमन करून, अद्वैतानुभव आल्यानं एकाकी आणि अपरिग्रह झालेला योगी एकान्तात नेहमी आत्मानंदात तल्लीन असतो. (६.१०) या विधानाचा विस्तार करताना ज्ञानोबाराया म्हणतात, योग्यांचे समुदाय विविध मार्गानं मूर्ध्निआकाशाकडे सत्वर जाण्यास निघाले, हे अनुभवाच्या पावलांनी जाता जाता तो (योग) मार्ग सुलभ झाला. त्या मार्गावर चालताना धन्यता वाटते. वैराग्याच्या वसंताचा बहर वर्णनातीत असतो. तो एकदा अनुभवला की शिष्य, भक्त, साधक सकोचतो. लहानपण मान्य करतो. प्रपंचामुळे अंधारलेलं मन गुरुचिंतनानं उजळून निघतं, म्हणतं, ‘मी लटिका पामर, काय देऊ ग्वाही?’ चिंतनानं श्रांत मन विश्रांती पावतं. अविश्वासू माणसाचा सहवास सुतकी असतो. तो कपाळीचा पाषाण टाळावा. तापसाचं तप जाणावं. राजसाचं राज्य ओळखावं. काय त्याज्य आहे हे ओळखावं. गुरूवरील विश्वास ढळू नये. सत्कर्मांना टाळू नये. तमोगुणांचं भरलेलं पापांचं गाठोडं कालगंगेत त्वरित सोडून द्यावं. ज्ञानाच्या सागरात कोरडं राहणं सज्जनांना शोभत नाही. गुरुप्रेम म्हणजे अमृताची धार! भक्तीच्या वाटेवर प्रगती करावी. मुक्तीची दिव्य शक्तीची प्राप्ती झाल्यावर अशक्य ते शक्य करण्याचा चमत्कार सद्गुरू करतो.

गुरूच्या अनुभवाच्या पावलांवर पाऊल ठेवून कैवल्याच्या मार्गावर भक्तिभाग्यवंतांचं प्रेम लाभतं. प्रपंच नावाचं व्यसन सुटता सुटत नाही. मन पांगळं होतं. श्रुती (कान) बधीर होतात स्मृती क्षीण होतात. गुरुप्रसादानं वाणीत गोडवा येतो. काय पाहावं, काय ऐकावं आणि काय बोलावं हे कळू लागतं. हे सगळं खरं, परंतु गुरूजवळ नसेल तर शिष्यानं काय करावं? या प्रश्नाचं उत्तर महादेव देतात –

‘हे प्रिये, ज्या दिशेला गुरुनाथांचे चरण विराजमान असतात, त्या दिशेला नित्य भक्तिभावानं नमस्कार करावा. सगुणभक्ती साध्य झाल्यावर निर्गुण भक्तीची ओढ वाटू लागते. अर्थात ही प्रक्रिया सहज घडून येते.’

‘सगुण-निर्गुण एकू गोविन्दू रे|’ असं माउली म्हणतात. गुरू विश्वव्यापी असल्यानं सर्व दिशा हेच त्याचं वस्त्र होय. हा गुरुभाव शिष्याला साधणं कठीण. गुरूनिवास जिथं असेल त्या दिशेला नमस्कार करावा. दिशा कळत नसेल तर स्वत:भोवती प्रदक्षिणा घालावी. साधकाची जशी श्रेष्ठ वा कनिष्ठ योग्यता, तशी साधना शिव सांगतात. पार्वती ही अनन्य, श्रेष्ठ भक्त आहे. तिच्या निमित्तानं सामान्य साधकास वेदव्यास बोध करतात.

भक्तीचा भाव चित्तात भावित होतो अन् तो बाहेर आल्यावर आचरणात दिसतो. आचारास प्रभावित करतो. भावाचा हा प्रभाव गुरू समजतो. देहानं केलेला नमस्कार मनानं गुरूपर्यंत जातो. गुरू हा सातासमुद्रापार असला तरी तो गुरुचरणांना स्पर्श करतो. देहापेक्षा मन सूक्ष्म. भावाचा अभाव असेल तर हा अनुभव येणार कसा? साधना करणारा कुठंही, कधीही अन् केव्हाही ती करतोच. त्याला स्थळ-काळाचं बंधन नसतं.

गुरू म्हणजे आत्मजाणिवेचा आरसा! आपलं स्वरूप दाखवणारा असा साक्षीत्वाचा सहवास लाभायला भाग्य लागतं. जिथं तपोतेजाची रास असते, तिथं अविद्येची रात्र कधी नसतेच! विरक्तीचं पाणिग्रहण केल्यावर मनाचं मनपण जातं. बोलाचं बोलपण फोल ठरतं. कारण तिथं शब्दांविण संवाद होत असतो. भ्रांतीचा सागर नसतो. व्यामोहाचा डोंगर नसतो. भुवनत्रयींची काजळी नसते अन् प्रलयींची वावटळसुद्धा नसते. शैव, वैष्णव, शाक्त, शास्त्र आणि इतर पंथ आणि ग्रंथ चित्तभ्रांत जीवांना कधीकधी कैवल्याच्या वाटेवरून दूर नेतात. गैरसमज वाढवतात. विविधांगी मतामतांचा गलबला निर्माण करतात. ‘मी’पणा ब्रह्मघोटाळा करतो.

यज्ञो व्रतं तपो दानं
जपस्तीर्थं तथैव च |
गुरुतत्त्वम विज्ञाय
मूढास्ते चरते जना: ॥८॥

यज्ञ, व्रत, तपश्चर्या, दानधर्म, जप, तीर्थयात्रा करणारे भाविक भक्त जोपर्यंत गुरुतत्त्व जाणत नाहीत, तोपर्यंत मूर्खासारखे भटकतात. या बहिरंग साधनेतच गर्क होतात. देहानं जे करता येतं, तेवढंच ते करतात. चित्त, अंतरंगापर्यंत भावभक्ती पोहोचतच नसेल तर ती साधना एकांकी ठरते.

ओल्या देहानं कोरडं स्नान करणारे अगणित असतात! मनानं शुष्कच राहतात. ज्ञानस्वरूप आत्म्याहून गुरू भिन्न नाहीये. गुरू भेटला तरी गुरुबद्दल आत्मीयता वाटत नसेल तर त्या भक्तीत सत्यता येणार कशी? मनातील विचार कमी झाले की, भक्त शांत होत जातो. भगवान शंकर पार्वतीला गुरुचरणांचं महत्त्व विशद करतात. गुरुभक्ती ही गुरुतत्त्वाच्या ज्ञानानं निर्माण होते. हे गिरिजे, गुरुचरणवंदन प्रतिदिनी करायला हवं. व्यवहार, व्यापार, संसार सांभाळून गुरुभक्ती करावी. जे संतसज्जन, योगीबैरागी आहेत, त्यांच्या सहवासात थोडी सवड काढून राहावं. वडीलधारी मंडळी अनुभवी असतात. त्यांना खूप काही सांगायची इच्छा असते, पण नव्या पिढीला सवड नसते किंवा आवड नसते. त्यांची निवड टी.व्ही., संगणक अन् भ्रमणध्वनी!
एक कथा आहे : एक होते गुरू. ते आपल्या काही शिपायांसोबत गेले नदीवर स्नानाला. तिथं काही यात्रेकरू आपसात जोरजोरानं भांडत होते. त्यांचा आरडाओरडा ऐकून एका शिष्यानं विचारलं,
“गुरुदेव, भांडणारी माणसं जवळ असतात, मग ती ओरडतात का?”

“बेटा, राग आला की शांती पळून जाते. माणसं एकमेकांवर रागवतात तेव्हा मनानं ते दूर जातात. क्रोध हा माणसांना तोडतो. ओरडतो, पण ते मनाला न भिडता मेंदूला भिडतं. बुद्धीला कळतं. मनाला, चित्ताला, अंत:करणाला बोल कळतात प्रेमाचे, मायेचे, वात्सल्याचे, सांत्वनाचे, धीराचे! तेव्हा मन मनास मिळालेलं असतं. बोलायची गरजच नसते. स्पर्शाची भाषा जिवाला भिडते. हळुवारपणे बोलणारी जीवलग व्यक्ती हृदयात वास करते. तिच्या प्रेमाचा सुवास जीवनातून कधी जात नाही! ‘शब्दांवाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले’ हे गातात ते याच अनुभवानं. ‘शब्देविण संवादु’ माउली म्हणतात तो हाच!
अभ्यासाच्या शीतल छायेत गुरुकृपा लाभते. तेव्हा तेच अभ्यासाचं वेड वाढत जातं. गुरू परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर कोणत्याही परिस्थितीत जगावंसं वाटतं. जगण्या-वागण्यात चैतन्य सळसळतं. तो आत्मानंद बोलण्यात हसण्यात दिसतो.
जय गुरुदेव!

(arvinddode@gmail.com)

Recent Posts

मंदिर पाडण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

उच्च न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती मुंबई : विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर तोडक कारवाईप्रकरणी पालिकेचे विभाग…

1 hour ago

ईडीची टांगती तलवार…

स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर डायरेक्टोरेट ऑफ इर्फोसमेन्ट (ईडी)ने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली सोनिया गांधी व…

2 hours ago

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या तयारीसाठी सुवर्णसंधी; एसएसबी कोर्ससाठी मोफत प्रशिक्षण

मुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी…

3 hours ago

साईबाबांच्या चरणी ६८ लाखांचा सुवर्ण मुकुट; श्रद्धेची भक्तिपूर्ण देणगी

दक्षिण भारतीय साईभक्तांकडून सर्वाधिक मुकुट शिर्डी : ज्यांच्या चरणी श्रद्धा आणि सबुरीने नतमस्तक झाल्यावर माणसाचं…

3 hours ago

Star Pravah vs Sony Marathi : स्टार प्रवाह आणि सोनी मराठीमध्ये टक्कर!

'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका…

5 hours ago

Nails : नखे ठरवतात तुम्ही किती वर्ष जगणार; जाणून घ्या कसं?

मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण…

5 hours ago